ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक वसंत चव्हाण यांचे निधन

ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक वसंत चव्हाण यांचे निधन

मूळ कुणकेश्वर येथील ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक, पर्यटन व्यवसाय अभ्यासक नाना चव्हाण (८५) यांचे गुरुवारी रात्री १०.१५ वा. च्या सुमारास मुंबई- चेंबूर येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले.

कुणकेश्वर येथील विकसित होणाऱ्या पर्यटनाचा विचार करून वसंत चव्हाण यांनी सर्वप्रथम पर्यटनात्मक दृष्टिकोनातून ‘सावली बंगला रिसॉर्ट’ची स्थापना केली होती. कुणकेश्वर गावाच्या पर्यटनात्मक विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. पर्यटन विषयावर त्यांचा चांगला अभ्यास होता. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची विशेष ओळख होती. सामाजिक काम करताना त्यांनी गावामध्ये विविध उपक्रम राबविले होते. साई शिक्षण संस्था ओरोस या संस्थेच्या संचालकपदावरही त्यांनी काम केले होते. पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जि. प. सिंधुदुर्गच्या माजी आरोग्य सभापती पार्वती चव्हाण यांचे ते पती होत.