मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात

जनावराला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याची शक्यता ; तीन जण जखमी

कणकवली :

मुंबई – गोवा महामार्गावर वागदे येथे हॉटेल वक्रतुंड समोरील महामार्गावर सोमवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास चिरे वाहतूक करणारा आयशर ट्रक ( एम एच ०७ सी ६१५४ ) पलटी होऊन अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार आ अपघातात तीन जण जखमी झाल्याचे समोर आले. अपघाताची माहिती मिळताच हायवे ट्राफिकचे पोलीस तसेच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी महामार्गावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिरे पसरले होते. तसेच काही काळ महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून रस्त्यावरील चिरे तसेच चिऱ्यांची पडलेली लालबुंद माती बाजूला करून महामार्ग वाहतुकीस सुरळीत करण्यात आला.

या अपघातात प्रसाद आहेर ( वय २१ तळेबाजार ), किशोर जंगले ( वय ३० पिसेकामते ), दिलीप शेलार ( वय ५५ नांदगाव ) हे किरकोळ जखमी झाले. अपघातातील जखमींना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र झालेली दुखापद ही किरकोळ स्वरूपाची असल्याने त्यांना औषधोपचार करून पाठविण्यात आले. मुंबई – गोवा महामार्गावर ओरोसहुन कणकवली च्या दिशेने जाताना जनावर आडवं आल्याने त्या जनावराला वाचविण्यासाठी चालकाने ब्रेक लावला. मात्र त्या जनावराला वाचविण्याच्या प्रयत्नात ताब्यातील ट्रक पलटी होऊन अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही. या अपघात प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्री. वंजारे हे अधिक माहिती घेत आहेत.