क्षत्रिय मराठा समाजाची जिल्ह्यास्तरीय सभा देवरुखमध्ये उत्साहात संपन्न

दिनांक १७ जानेवारी रोजी चिपळूण येथे संपन्न होणार कोकण मराठा मेळावा

मराठा मेळाव्यामध्ये “जातिवंत मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याला” होणार सुरुवात

रत्नागिरी :      दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी क्षत्रिय मराठा समाज रत्नागिरी जिल्हा जिल्हास्तरीय सभा देवरुख नगरपंचायत सभागृहात सकाळी ११.०० वाजता उत्साहात संपन्न झाली.

राजन घाग आणि सुधीर भोसले यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेच्या प्रतिमेला मराठा फाउंडेशन देवरुखचे अध्यक्ष गणेश खामकर, तानाजीराव सावंत आणि सदानंद ब्रीद यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी जिल्ह्याचे तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.

 

सदर सभेच्या अध्यक्षपदी तानाजीराव सावंत यांची निवड करण्यात आली. तानाजीराव सावंत यांनी जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधी आणि सर्व मराठा बांधवांचे स्वागत केले. निखिल साळवी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. संकेत साळवी यांनी सभेमध्ये विषयांची विस्तृत मांडणी करून सभेचा हेतू आणि उद्देश स्पष्ट केला.

 

दापोलीचे नेते सुनील दळवी यांनी मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन जिल्ह्याची भूमिका मांडल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. दापोलीतील मराठा प्रतिनिधींनी दळवी साहेबांच्या वतीने सत्कार स्वीकारला.

 

क्षत्रिय मराठा समाजातील रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्यकारणीवर प्रत्येक तालुक्यातील सात सदस्यांची निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर प्रत्येकांचे पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.

 

सदर सभेमध्ये कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळालेच पाहिजे असे पुन्हा एकदा सर्वांनी ठामपणे भूमिका मांडली. सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्यामुळे मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाल्या आहेत. असे राजन घाग यांनी सांगून आरक्षणाबाबत मराठा बांधवांना योग्य मार्गदर्शन करून संभ्रम दूर केला. ॲड. पूनमताई चव्हाण यांनी कोकण विभागासाठी मराठा आरक्षणाच्या न्यायासाठी कायदेशीर सहकार्याची भावना व्यक्त केली.

 

संगमेश्वर तालुक्यातून मराठा फाउंडेशन देवरुखच्या माध्यमातून इ EWS, अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, सारथी इत्यादी योजना मराठा बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. त्याबद्दल सुधीर भोसले यांनी समाधान व्यक्त केले..

 

मराठा फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश खामकर यांनी योजनांच्या मार्गदर्शनाबाबत अधिक आढावा घेऊन तरुणांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सदर योजना तरुणांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असे सांगून विविध मेळावे आणि उपक्रम आयोजित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्येही मराठा समाजाच्या कल्याणकारी योजना पोहोचल्या पाहिजेत अशी अशा व्यक्त केली.

 

आजच्या क्षत्रिय मराठा समाज, रत्नागिरी जिल्ह्याच्या सभेमध्ये तिन्ही जिल्ह्यांनी एकत्र यावे अशी भूमिका मांडली. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यातील मराठा समाजाची एक वेगळी भूमिका आहे. ही भूमिका स्पष्ट करण्यासाठी दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी चिपळूण येथे क्षत्रिय मराठा मेळावा संपन्न होणार आहे. असे निश्चित करण्यात आले.

 

हा लढा जातिवंत मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा आहे. . आणि म्हणूनच मराठा आणि मराठा म्हणूनच आरक्षण मिळाले पाहिजे. . आणि तेही टिकणारे. . ! असा एकमुखी निर्णय घेऊन नियोजनला सुरुवात करावी, असे सांगून राजन घाग यांनी संगमेश्वर तालुक्याच्या आयोजनाबद्दल मराठा फाउंडेशनची स्तुती करून उपस्थित सर्व मराठा बांधवांचे शाब्दिक आभार मानले. मराठा फाउंडेशनकडून सर्व मराठा बांधवांना सप्रेम भेट दिलेली राजमुद्रा आणि सभागृहातील आकर्षक रांगोळी सर्वांची मने जिंकून गेली. सदर सभेला मराठा फाउंडेशन अध्यक्ष गणेश खामकर, सचिव तानाजीराव सावंत व मराठा फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी व मराठा बांधवांसह मराठा भगिनी उपस्थित होत्या.

संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन केतन ब्रिद यांनी केले.