रुपेश वाईकर (दापोली प्रतिनिधी)नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरांमधून कोकणात पर्यटक दाखल होणार आहेत पर्यटकांनी दापोलीला ही मोठी पसंती दिली आहे मुंबई पुण्यापासून जवळ असलेल्या दापोली गुहागर तालुक्यांना पर्यटकांची मोठी पसंती आहे. अनेक पर्यटकांनी महिनाभर आधीच रिसॉर्ट बुकिंग करून ठेवले आहेत रिसॉर्ट चालकांनी पर्यटकांच्या स्वागतासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. दापोली तालुक्यात अनेक रिसॉर्ट्स हाऊसफुल होऊ लागली आहेत, ही स्थिती अन्य तालुक्यात आहे.
शनिवार, रविवार सुट्टी असल्याने तसेच नाताळ सुट्टी यामुळे थर्टीफर्स्टनिमित्त येथील हॉटेल, लॉज आता अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल होत आले आहेत. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतभरातून पर्यटक कोकणात दाखल होतील, नववर्षाच्या स्वागताला कोकणात येण्यासाठी तयारी पर्यटकांनी काही महिने आधीच करून ठेवली आहे अशी माहिती लाडघर येथील पर्यटन व्यवसायिक प्रियंका कर्देकर यांनी लोकसत्ता जवळ बोलताना दिली.
कोकणाला खाद्य संस्कृतीचाही मोठा वारसा लाभला आहे. उकडीच्या मोदकांपासून अगदी ताज्या मासळीच कालवण,कोंबडीवडे अशाप्रकारे शाकाहारी व मांसाहारी अनेक पदार्थांची खास कोकणी पद्धतीची रेलचेल ही खाद्य संस्कृती पर्यटकांना आवडते. या खाद्य संस्कृतीचे स्टॉलही दापोली शहरात मध्यवर्ती ठिकाणी महिला बचत गटांकडून लावण्यात आले आहेत. त्यामुळे या खाद्य संस्कृतीचा आस्वाद पर्यटकांना एकाच ठिकाणी घेता येणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री उशिरापर्यंत जल्लोष साजरा करणे, असेही अनेकांनी नियोजन केले आहे. सागराच्या साक्षीने सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागताच्या पार्ट्यांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हजारो पर्यटक कुटुंब कोकणात दाखल होणार आहेत. दापोली तालुक्यात मुरुड, कर्दे, लाडघर, केळशी,कोळथरे येथील समुद्रकिनारे हे पर्यटकांच्या पसंतीची ठिकाण आहेत.
अनेक रिसॉर्ट चालक यांच्याकडूनही नववर्षाच्या स्वागतासाठी सुरेल गायनाच्या मैफिलीसारख्या काही संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पर्यटकांच्या कुटुंबासाठी करण्यात आलं आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी अवघे कोकण सज्ज झाला आहे.दरवर्षी पासून दिवाळी सुट्टी पडल्या की कोकणातील पर्यटन हंगाम सुरू होतो यावर्षीही हा पर्यटनाचा हंगाम चांगल्या प्रकारे सुरू झाला असून यावर कोकणातील मोठी अर्थव्यवस्था अवलंबून आहे अशी माहिती पर्यटन उद्योजक सचिन तोडकर यांनी दिली. अलीकडे काही वर्ष गोव्याच्या ऐवजी पर्यटक कोकणातील समुद्र किनाऱ्याना पसंती देत आहेत. ख्रिसमस आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. येथील आंबा, काजू, नारळ, पोफळीच्या बागा आणि अथांग स्वच्छ समुद्रकिनारे ही रत्नागिरी, सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांची विशेष ओळख असून येथील ऐतिहासिक ठिकाणे निसर्गदत्त लाभलेली जैवविविधता, धार्मिक व ऐतिहासिक ठिकाण हे कोकणातील पर्यटनाचे मोठे आकर्षण आहे.












