माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीबाबत खेड गटविकास अधिका∙यांचे अजब आदेश
खेड | प्रतिनिधी : तालुक्यातील एका राजकीय वरिष्ठ पदाधिका-यांने माहितीच्या अधिकारात खेड पंचायत समितीतील कारभाराची अनेक विषयांची माहिती मागितली आहे. पंचायत समितीतून सदर माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने या पदाधिका-यांने माहितीच्या अधिकाराखालील प्रथम अपील दाखल केलेले आहेत. अशाच दोन अपीलांवर सुनावणी घेवून प्रथम अपीलीय अधिकारी तथा गट विकास अधिकारी यांनी अजब आदेश दिल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांकडून मिळाली आहे.
सदर पदाधिका-यांने खेड पंचायत समिती अंतर्गत कार्यरत मुख्यालयी रहात असलेल्या जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांची माहिती तसेच त्यांनी घेतलेले घरभाडे, सादर केलेली कागदपत्रे याची मागणी केलेली आहे. सदर माहिती मिळाली नसलेने या पदाधिका-याने गटविकास अधिकारी यांचेकडे अपीलीय अधिकारी म्हणून अपील केले. या अपीलांचे सुनावणीवर खेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी अजब आदेश दिले आहेत.
आदेश देतांना गट विकास अधिकारी (अपीलीय अधिकारी) यांनी म्हटले आहे की, “घरभाडे भत्ता मिळणेसाठी जिल्हा परिषद कर्मचा-यांनी मुख्यालयी राहणेबाबतचा ग्रामसभेचा ठराव आवश्यक असल्याचा शासन निर्णय अपीलार्थी यांनी कार्यालयाला पुरवावा. तो दिल्यानंतर त्याची माहिती अपीलार्थी यांना देण्यात येईल.” गट विकास अधिकारी यांना त्यांच्या कामाकाजाशी संबंधित शासनाने काढलेल्या प्रत्येक शासन निर्णयाची, परिपत्रकाची व आदेशाची त्यांना माहिती असायला हवी. तसेच त्याची प्रत त्यांच्या कार्यालयाकडे असायलाच हवी. कर्मचारी मुख्यालयी राहण्याबाबत ग्राम विकास विभाग, शासन परिपत्रक क्रमांक – पंरास २०१८/प्र.क्र.४८८/आस्था- ७ दिनांक ९ सप्टेंबर, २०१९ व वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक – घभाभ-१०१५/प्र.क्र.१/सेवा-५ दिनांक ०७ ऑक्टोबर, २०१६ हे परिपत्रक व शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच सर्व शासन निर्णय व परिपत्रके महाराष्ट्र शासनाचे वेब साईट वर उपलब्ध असतांनाही गटविकास अधिकारी असे आदेश देत असतील तर ही बाब शासनाने त्वरीत दखल घेण्याइतपत गंभीर आहे.
खेड पंचायत समिती कार्यालय म्हणजे अंधेर नगरी चौपट राजा अशी म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे, अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे प्रमुख व जबाबदार अधिकारी असूनही इतक्या दखलपात्र विषयाबाबत अनभिज्ञता दाखवित असल्याने “या टोपीखाली दडलंय काय ?” अशी जोरदार चर्चा खेड तालुक्यात चालू आहे.






