कोकण रेल्वे मार्गावरील मंगळुरू एक्स्प्रेसला दोन जादा डबे

खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या उधना ते मंगळुरू या विशेष रेल्वे गाडीला स्लीपर श्रेणीतील दोन जादा कोच जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

हिवाळी पर्यटन हंगाम तसेच ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना गर्दी वाढू लागली आहे. नियमित गाड्या तसेच विशेष गाड्यांना अतिरिक्त डबे जोडूनही कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे अवघड झाले आहे. प्रवाशांच्या या गर्दीमुळे सुरत जवळील उधना ते कर्नाटकमधील मंगळूर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला एक स्लीपर तसेच एक थ्री टायर वातानुकूलित डबा अधिकचा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार ०९०५७ या उधना ते मंगळूर फेरीसाठी दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी तर मंगळूर ते उधना (०९०५८) फेरी करता २५ डिसेंबर २०२३ रोजी स्लीपर श्रेणीचा एक तर वातानुकूलित थ्री टायर श्रेणीचा एक असे दोन जादा डबे जोडले जाणार आहेत.