सायबर गुन्ह्यात जागरूक रहा- डॉ. अक्षय फाटक

चिपळुणात गोडबोले क्लासेसतर्फे व्याख्यान

चिपळूण (प्रतिनिधी) : इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून, सायबर क्राईमचे प्रमाण वाढत आहे. किरकोळ चुकांमुळे मोठा आर्थिक फटका बसतो, सोशल मीडियातील अज्ञानातून काहीजण आत्महत्यासारखे पर्याय स्वीकारतात. त्यामुळे तरुणांसह सर्वांनीच सायबर क्राईमविषयी जागरुक राहणे गरजेचे आहे, असे मत डॉ. अक्षय फाटक यांनी चिपळुणातील गोडबोले क्लासेस आयोजित कार्यक्रमात सांगितले.

सायबर क्राईमचे प्रमाण वाढू लागले आहे. विविध प्रकारच्या ॲपच्या वापराची माहिती नसल्याने अनेकांना त्याचा मोठा फटका बसतो. याविषयी पालक आणि विद्यार्थांची जागृती होण्यासाठी गोडबोले कलासेसचे संचालक प्रा. अमेय गोडबोले यांनी सायबर क्राईमविषयी व्याख्यानाचे आयोजन केले होते. डॉ. फाटक यांनी सोशल मीडिया वापराचे आयपी अॅड्रेस आणि पासवर्ड सुरक्षित राहिलेले नाहीत. तो ३०० रुपयांनादेखील विकला जातो. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपला एकच पासवर्ड दिला असेल तर ते अकाउंट हॅक होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी कोणती काळजी घ्यावी या विषयीची त्यांनी माहिती दिली. अलीकडे आपले आधारकार्ड, पॅनकार्डची झेरॉक्स काढल्यानंतर त्यातील खराब झालेली झेरॉक्स काळ्या बाजारात विकली जातात. ही कागदपत्रे फ्रॉड करण्यासाठी वापरतात.

अशी कागदपत्रे नष्ट करावीत. आपल्या बँकेशी निगडित कोणतीही माहिती अनोळख्या व्यक्तीला देवू नका. सोशल मीडियावरील अकाउंटचे पासवर्ड कोणालाही सांगू नका तसेच दर ३ ते ६ महिन्यांनी पासवर्ड बदलत राहा. मोबाइल हॅक झालाय का ते तपासण्यासाठी मोबाईलची बॅटरी लवकर संपत आहे का, नको असलेले अॅप इन्स्टॉल आहे का, मोबाईल प्रमाणापेक्षा जास्त गरम होतो का तपासण्याची सूचना केली. त्याचबरोबर कोणत्याही खोट्या लॉटरी, ऑफर, नोकरी, वीजबिल, लिंक यांच्यावर विश्वास न ठेवता कोणतीही वैयक्तीक माहिती देऊ नये, बँक तसेच सोशल मीडियासंदर्भातील ओटीपी कोणालाही सांगू नये. व्हॉटस्अॅपवर अनोळख्या व्यक्तींचे व्हिडिओ कॉल घेताना आपला चेहरा दिसणार नाही याची काळजी घ्यावी असेही डॉ. फाटक यांनी स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थी व पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. पालक वैभव चव्हाण यांच्या हस्ते डॉ. फाटक यांना रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.