मालडी येथे देवजी बुवा मठात सालाबादप्रमाणे दत्त जयंतीचा उत्सव उत्साहात साजरा

मालवण तालुक्यातील मालडी येथे देवजी बुवा मठात सालाबादप्रमाणे दत्त जयंतीचा उत्सव स्थानिक ग्रामस्थांनी गाव पातळीवर आयोजित केला होता. या वेळेस दत्त जयंती पुराणोत्त पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय समिती आणि प्रमुख कार्यवाह यानी घेतला होता.

त्या प्रमाणे पालखीतून मिरवणूक काढण्याचे ठरले होते. पालखीच्या सजावटीस सायंकाळी ५ वाजता सुरुवात करून सायंकाळी ६ वाजता विविध प्रकारच्या फुलानी सजवून दत्त जन्मासाठी तयार केली. अशा पद्धतीने दत्त जयंती साजरी करण्याची प्रथम वेळ असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आकर्षण होते.नियोजित कार्यक्रमानुसार संध्याकाळी ६ वाजता शास्त्रोक्त पद्धतीत पुजेस प्रारंभ होउन ६.३५ च्या दरम्यान पूर्ण झाल्यावर दत्ताची मुर्ती पालखीत विराजमान करून उपस्थित महिलांनी दत्त जन्माची पाळणा गीते गायली. त्या नंतर मंदिरासभोवताली पालखीसोबत ५ प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर मंदिराच्या गाभाऱ्यात सर्व ग्रामस्थांनी ताल सुरात आरत्या गायल्या.आरतीनंतर ब्राह्मणांनी गावकऱ्यांच्या वतीने दत्त महाराजांवर गाऱ्हाणे केल्यावर रात्रौ ठीक ८.३० वाजता महाप्रसाद सुरूवात झाली. अंदाजे १२५/१३० मंडळीनी महाप्रसादाचे लाभ घेतला.महाप्रसादानंतर ३ स्थानिक सुश्राव्य भजनामुळे कार्यक्रमास एक वेगळीच रंगत आली आणि कार्यक्रम समाप्तीस वेगळीच झालर लाभली.

या कार्यक्रमास आयोजन तसेच नियोजन यात स्थानिक ग्रामस्थांकडून अतीव मेहनत आणी कोणतीही कमतरता जाणवली नाही. त्यांच्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणे केवळ अशक्य होते.