खेड तालुका कृषी कार्यालयात ३२ पदे रिक्त

खेड(प्रतिनिधी) केंद्र व राज्य शासनाच्या शेतीविषयक विविध योजना कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्या जातात. खेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ६७ पैकी ३५ कर्मचारी कार्यरत असून ३२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये कृषी सहाय्यकांची सर्वाधिक पदे असून योजनांची अंमलबजावणी करताना कार्यरत कृषी सहाय्यकांना करसत करावी लागत आहे.

तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींच्या हद्दीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या ३६ सजा येतात. या सजांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या

शेतीविषयक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र गेली अनेक वर्षे शासनाकडून रिक्त जागांसाठी पदभरतीच झालेली नाही. यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी मंजूर असलेल्या ६७ पदांपैकी ३२ पदे अद्याप रिक्तच आहेत.

त्यामुळे कार्यरत असलेल्या ३५ पदांवर अतिरिक्त भार पडत आहे.

महिला कर्मचाऱ्यांची प्रसुती रजा, अन्य कर्मचाऱ्यांची बदली व रिक्त पदांमुळे कृषी सहाय्यकांना शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवताना त्यांची अंमलबजावणी करताना मर्यादा पडत आहे. कृषी सहाय्यकांच्या रिक्त पदांचा व अतिरिक्त भार उर्वरित कृषी सहाय्यकांवर येवून ठेपला असून जादा सजातील गावांचे कामकाज पाहताना धावपळ करावी लागत आहे.

कार्यालयीन रिक्त पदांमुळे उर्वरित कार्यरत कर्मचाऱ्यांना जादा कामकाज पहावे लागत आहे.

खेड तालुका कृषी कार्यालयासाठी मंजूर एक तालुका कृषी अधिकारी पद व ४ कृषी अधिकारी पद कार्यरत आहेत. मंजूर एक सहाय्यक अधीक्षक पद कार्यरत असून मंजूर एक वरिष्ठ लिपिक पद रिक्त आहे.

मंजूर असलेले ४ लिपिक पद देखील रिक्तच असून नकाशे तयार करण्यासाठी अनुरेखकसाठी मंजूर असलेली ५ पदेदेखील रिक्तच आहेत.

 

 

रिक्त पदांबाबतचा अहवाल दर महिन्याला पाठवला जातो

 

कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील रिक्त असलेल्या पदांबाबतचा अहवाल दर महिन्याला वरिष्ठ पातळीवर कार्यवाहीसाठी पाठवला जातो.

 

– रवींद्र माळी, कृषी अधिकारी-