खेडमध्ये ‘शेततळे’ योजनेला अल्प प्रतिसाद; केवळ २ लाभार्थी!

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसह पालेभाज्या व फळ लागवडीसाठी शाश्वत पाण्याचा खोत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मागेल त्याला शेततळे योजना राबवली जात आहे. या योजनेसाठी तालुक्यातून यंदा ३० शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र त्यातील २० शेतकरी स्वत:हून योजनेतून बाहेर पडल्याने केवळ २ शेतकरीच लाभार्थी ठरले आहेत. उर्वरित ८ प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या सरासरीत घट झाली आहे. पावसाचे कमी प्रमाण व अनिश्चिततेमुळे ग्रामीण भागातील कोरडवाहू क्षेत्रातील

भातशेती, भाजीपाला पिकांवर व फळपीक लागवडीवर तसेच उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसून येते. पावसात पडलेला खंड, पाण्याची टंचाई यामुळे पिकांचे नुकसान होवू नये व उत्पन्नात व्हावी, यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेततळे उपलब्ध करून दिले जात आहेत. १५x१५ मीटर लांबी रूंदी व ३ मीटर खोलीसाठी २६ हजार रूपये, तर ३४ मीटर लांबी रूंदी व ३ मीटर खोलीसाठी ७५ हजार रूपयांचे अनुदान शासनाकडून दिले जात आहे.

शेततळेसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०२३ – २४ या वर्षात ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र त्यातील २० शेतकऱ्यांनी या योजनेतून बाहेर पडत आपले अर्ज रद्द केले आहेत.

त्यामुळे उर्वरित १० पैकी २ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर झाले असून यामध्ये तालुक्यातील तिसंगी येथील प्रल्हाद बाबुराव शिंदे व आंबयेतील दिगंबर धोंडू सकपाळ यांचा समावेश आहे. उर्वरित ८ शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित असून लवकरच त्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

 

 

योजनेचा लाभ घ्या — रवींद्र माळी, अधिकारी, खेड तालुका कृषी कार्यालय

 

शेततळ्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी करावी

शासनाकडून मागेल त्याला शेततळे उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवली जात आहे. शेततळे निर्माण केल्यास उत्पादनात व उत्पन्नात वाढ होवून जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याने तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.