मसुरे | प्रतिनिधी
मसुरे देऊळवाडा गावठणवाडी येथील जेष्ठ सर्पमित्र नरेश अनंत बागवे (५८ वर्ष) यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मसुरे देऊळवाडा रमाई नदीकिनारी बाव- गावठणवाडी येथे झाडाला फास लावलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह दिसून आला. याबाबत त्यांच्या भावाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ओळख पटविली. घटनेची माहिती सुरेश बागवे यांनी मसुरे पोलीस स्थानकात दिली.व्यसनामुळे आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे आचरा उपकेंद्राचे डॉ. कपिल मेस्त्री यांनी गुरुवारी सकाळी शवविच्छेदन केले. नरेश बागवे हे शिवसेनेचे देऊळवाडा विभागाचे माजी शाखाप्रमुख होते. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यांनी आत्महत्या केल्यामुळे दुःख व्यक्त होत आहे. पश्चात भाऊ, भावजय, बहीण, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद नाईक, विवेक फरांदे अधिक तपास करत आहेत.












