मंडणगड : प्रतिनिधी : नादुरुस्त आंबेत पुलामुळे मंडणगड व दापोली आगाराच्या मुंबई व पुणे या महानगराकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसफेऱ्या सद्या लांब पल्ल्याच्या व वेळकाढू पर्यायी मार्गाने सुरु असल्याने प्रवाश्यांना अतिरिक्त भुर्दंड व त्रास सहन करावा लागतो, त्याचबरोबर प्रवाशांना प्रवासासाठी सद्या पर्यायी एसटी स्टाँप असलेल्या कुंबळे, विसापूर येथे जावे लागते. त्यामुळे शहरातील रिक्षाव्यवसाय व बाजारपेठेवर त्याचे परिणाम दिसून येत असल्याने या सर्व बाबींचा विचार करून लोकहिताच्या दृष्टीने मंडणगड येथील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकर घेवून तालुकाप्रमुक प्रताप घोसाळकर, शहरप्रमुख विनोद जाधव यांनी ही वाहतूक पूर्ववत म्हाप्रळ – आंबेत मार्गे उपलब्ध असलेल्या फेरीबोटीच्या सहाय्याने सुरु करण्याची निवेदनाद्वारे मागणी मंडणगडचे आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांच्याकडे दि. ६ फेब्रुवारी रोजी त्यांची भेट घेऊन केली आहे.
निवेदनातील माहितीनुसार, मंडणगड बसस्थानकातून मुंबई, पुणे या महानगराकडे जाणाऱ्या एसटी बससेवा नादुरुस्त आंबेत पुलामुळे म्हाप्रळ – आंबेत मार्गे न जाता कुंबळे किंवा विसापूर मार्गे महाड, दापोली – खेड मार्गे मुंबई, पुणे या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे, त्यामुळे तालुक्यातील प्रवाश्यांना त्याचा नाहक आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्यय सहन करवा लागतो, या पर्यायी वाहतुकीने ६० किमी चे अंतर व दोन तासांचा अतिरिक्त कालवधी लागतो. प्रवाश्यांना थांब्यासाठी कुंबळे किंवा विसापूर येथे जावे लागत असल्याने त्याचा थेट परिणाम शहरातील बाजारपेठ व रिक्षा व्यवसायावर झालेला पाहायला मिळतोय. सद्या सार्वजनिक बांधकाम विभागच्या वतीने सावित्री नदीवर म्हाप्रळ ते आंबेत अशी फेरीबोट सेवा सुरु असून याद्वारे खासगी ट्रक, बस या सारख्या अवजड वाहनांची वाहतूक होत आहे, अश्या रीतीने एसटी बस सेवा रो रो सेवेच्या सहय्याने सुरु केल्यास प्रवाश्यांच्या सर्व समस्या दूर होऊन प्रवास सोयीचा होईल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी विभाग प्रमुख संजय शेडगे, युवासेना जिल्हाधिकारी चेतन सातोपे, सचिव सिद्धेश देशपांडे, प्रतिक पोतनीस आदि उपस्थित होते.