चिपळुणातील सांस्कृतिक चळवळीला नवं संजीवनी देणारे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र

सन २०२३ मधील रसिक आणि कलावंतांसाठी सकारात्मक ऊर्जा देणारी गोष्ट

संतोष कुळे | चिपळूण : नवीन वर्षात पदार्पण करताना गतवर्षी आपण काय कमावलं आणि गमावलं याची बेरीज वजाबाकी करताना चिपळूणकरांना मात्र एका सकारात्मक बेरजेचे गणित मांडावेच लागेल. कारण गेली १७ वर्षे चिपळूणच्या सांस्कृतिक नगरीतील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बंद होते. त्यामुळे रसिक कलेपासून दुरावला होता. मात्र 15 ऑगस्ट 2023 रोजी तिसरी घंटा वाजली आणि सांस्कृतिक केंद्राचा पडदा रसिकांच्या सेवेसाठी उघडला गेला. तेव्हापासूनच नाट्य कला प्रेमींसाठी चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र एक नव संजीवनी ठरत आहे. चिपळूण नगरीतील सांस्कृतिक चळवळीला उभारी मिळाली असून पुन्हा कलाकार आणि रसिकांचं नातं दृढ होताना दिसून आले हीच विशेष बाब ठरली आहे.

चिपळूणही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. याच नगरीमध्ये नटवर्य स्वर्गीय काशिनाथ घाणेकर आणि इतर कलावंतांनी सुद्धा आपल्या नावाने चिपळूणच्या सांस्कृतिक कलेचा वारसा जोपासलेला आहे. अनेक नामवंत कलावंत या चिपळूणनगरीतून उदयास आले. सद्यस्थितीत चिपळूण येथील ओंकार भोजने हा कलाकार सुद्धा रंगमंच, छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर सुद्धा आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करीत आहे. निश्चितच चिपळूणकर म्हणून या गोष्टीचा अभिमान आहे. चिपळूण मधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र हे एक चिपळूवासीयांसाठी करमणुकीचे आणि मनोरंजनाचे साधन होते.

मात्र सन 2005 मध्ये आलेल्या महापुरामध्ये या नाट्यगृहाची दुरावस्था झाली. तेव्हापासून हे नाट्यगृह बंद होते. या नाट्यगृहाच्या कामकाजाबाबत सुरू असलेल्या हालचाली आणि सांस्कृतिक केंद्राबाबत घडणारे राजकारण या मध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अडकून पडले होते. त्यामुळे सांस्कृतिक चळवळ थांबली होती. नाट्यगृह नसल्यामुळे वेगवेगळी व्यवसायिक आणि प्रायोजित नाटके या ठिकाणी होणे बंद झाले. त्यामुळे रसिकांचा निश्चितच हिरमोड झाला होता . मधल्या काळामध्ये नाट्यगृहाचे काम होऊन त्यांचं उद्घाटन होणार होते. तोच पुन्हा एकदा 2021 मध्ये पुराचा तडाखा या नाट्यगृहाला बसला आणि पुन्हा हे नाट्यगृह बंद झाले. मात्र त्यानंतर रसिक आणि रंगकर्मी या सर्वांनी जोर धरून नाट्यगृह सुरू होण्यासाठी आवाज उठवल्यानंतर 15 ऑगस्ट 2023 रोजी खऱ्या अर्थाने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा पडदा उघडला आणि रसिकांची आनंदाने पावले पुन्हा या नाट्यगृहामध्ये वळू लागली. ही सगळ्यात 2023 या वर्षातील एक महत्त्वाची घटना असून चिपळूणकराना सकारात्मक ऊर्जा देणारी गोष्ट ठरली आहे.

चिपळुणात पुन्हा कार्यक्रमाची रेलचेल सुरू झाली. ऑगस्ट 2023 मध्ये उद्घाटन झाल्यापासून अनेक कार्यक्रम या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये होऊ लागले. गेली सतरा वर्ष रसिकांची पावले या सांस्कृतीक केंद्राकडे वळली नव्हती ती पुन्हा वळू लागली. सांस्कृतिक केंद्र रसिकांच्या प्रतिसादाने गजबजुन गेले.

यावर्षी अजून एक महत्त्वपूर्ण घटना घडली की, हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रातील प्राथमिक फेऱ्या यावर्षी चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये घेण्यात आल्या होत्या. दि. 25 नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान या प्राथमिक नाटकांच्या फेऱ्या पार पडल्या. याशिवाय लोकसत्ता आयोजित एकांकिका स्पर्धेचे फेरीही याच नाट्यगृहात झाली. चतुरंग सारख्या मोठ्या संस्थेचा कार्यक्रम सुद्धा इथे पार पडला . या सर कार्यक्रमांचा आनंद रसिकांनी मनमुराद घेतला. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, संकीर्ण कऱ्हाडे, शरद पोंक्षे, संतोष पवार, कविता लाड आणि इतर नामवंत कलावंतांच्या नाटकाचे प्रयोग याच सांस्कृतिक केंद्रांमध्ये पार पडले. अभिनेते प्रशांत दामले यांनी तर नाट्यगृहाबाबत समाधान व्यक्त करत चिपळूण येथे मराठी नाट्य परिषदेची उपशाखा सुरू करण्याचे आश्वासन येथील रंगकर्मींना दिले.

ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान सुमारे ३० हून जास्त नाटके आणि इतर स्थानिक कार्यक्रम या नाट्यगृहांमध्ये सादर झाले. या सर्व कार्यक्रमांचे कला रसिकांनी लाभ घेतला. त्यामुळेच सन 2023 मधील काही गोष्टींचा मागोवा घेताना जाणीवपूर्वक इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा उल्लेख करणे गरजेचे ठरते. त्यामुळेच खऱ्या अर्थाने दुरावलेली सांस्कृतिक चळवळ पुन्हा एकदा जिवंत झाली. कलाकार आणि रसिक या दोघांनाही नवसंजीवनी देणारे हे इंदिरा गांधी सांस्कृतिक नाट्य केंद्र ठरत आहे. स्थानिक पातळीवर कला सादर करण्यासाठी हक्काचा रंगमंच कलाकारांना उपलब्ध झाला आहे. यातूनच नवे कलाकार आणि येथील सांस्कृतिक चळवळ वाढणार आहे. त्यामुळे सन २०२३ या वर्षाचा विचार करता चिपळूण मधील रसिकांसाठी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र म्हणजे मनोरंजनाचा खजिना आणि मनाला टेंशन फ्री करण्यासाठीची नवी ऊर्जा आहे.