साहित्यीक, लेखक, कवींनी बदलांचा मागोवा घेवून माणूसपण जपणारं साहित्य निर्माण केलं पाहिजे- प्रा. उत्तम कांबळे

राजापूर (वार्ताहर): जगात होणारा कोणताही बदल हा माणसाशी नात ठेवणारा हवा. हे असच चालणार का? असा प्रश्न लेखकाला पडला पाहिजे. जग बदलत आहे अशावेळी माणसांसाठी कोणी तारणहार असेल तर तो साहित्यीक आहे. त्यामुळे साहित्यीक, लेखक, कवींनी बदलांचा मागोवा घेवून माणूसपण जपणारं साहित्य निर्माण केलं पाहिजे असे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, संपादक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. उत्तम कांबळे यांनी येथे केले.

कोकण मराठी साहित्य परिषद शाखा राजापूर आणि सहयोगी संस्थांच्या वतीने नूतन विद्यामंदिर ओणी येथे कवी केशवसुत साहित्य नगरीत आयोजित कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानावरून प्रा. कांबळे बोलत होते.
या संमेलनाचे उद्घाटन प्रसिध्द लेखक दि. बा. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष अॅड. वासुदेव तुळसणकर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा सौ. नमिता कीर, संयोजन समिती अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार, प्रा. आप्पासाहेब खोत, प्रा. बाबासाहेब परीट, अरविंद गोसावी, सुर्यकांत तुळसणकर, गणपत भारती आदी मान्यवर उपस्थीत होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करून या साहित्य समेंलनाचे उद्घाटन करण्यात आले.
सध्या जागतिकीकरणाचे बरेवाईट पैलू मोठया प्रमाणावर प्रकट होत आहेत. आपण काळाबरोबर चाललो नाही. आपल्या शब्दांनी काळ पकडला नाही तर माणूस आणि साहित्य म्हणून मागं पडू. माणसाच्या संवेदनाच बोथट होवू लागल्या आहेत. किंवा त्यांचेही यांत्रिकीकरण होऊ लागले आहे. अशावेळी साहित्यानं जीवनवादी भूमिका अधीक व्यापक करायला हवी. मराठी साहित्यात माणसांच्या नव्या लढाया दिसायला हव्यात.

नवी आयुध दिसायला हवी. येणाऱ्या काळात पृथ्वी स्थीर ठेवायची असेल तर असं साहित्य लिहा कि आपली पृथ्वी कोणी हायजॅक करणार नाही. पृथ्वीवरचा माणूस कुणी विकृत करणार नाही. माणूस आणि संगणक या लढाईत माणसाच्या बाजुने, बैल आणि मोट या लढाईत बैलाच्या बाजुने, भांडवलशाही आणि लोकशाही यामध्ये आपण लोकशाहीच्या बाजुने, धर्माधपणा आणि संविधान आपण सविंधानाच्या बाजुने, कुंभमेळा आणि संमेलन आणि संमेलनाच्या बाजुने उभं राहत रहा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

जर माणसाला स्वत:चा चेहराच माहिती नसेल तर तो स्वत:लाच वेगवेळया रूपात संबोधील हे घडू नये म्हणून साहित्यीक माणसाला चेहरा देतात. आणि व्यवस्था जेव्हा माणसाचा चेहरा ओरबाडून घेण्याचे प्रयत्न करतात तेव्हा पुन्हा शब्दांच्या ढाली करून माणसाच्या मागे उभे राहतात.आपण आज अशा काळामध्ये उभे आहोत. की, जिथे जग जागतिकिकरण, खाजगीकरण, उदारिकरण या तत्वावर उभा आहे. जे स्वातंत्र, समता आणि बंधुतेवर उभे होते. माणसांना मदत करणारे यंत्र हवे. माणसांना मारणारे नकोत. साहित्य हे माणसाच्या भावविश्वाला जागवणारं असलं पाहिजे असे प्रतिपादन प्रा. कांबळे यांनी यावेळी केले.

प्रास्ताविक अॅड. शशिकांत सुतार यांनी केले तर स्वागताध्यक्ष अॅड. वासुदेव तुळसणकर यांनी संमेलन आयोजनाचा हेतू तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला.
तर सौ. नमिता कीर यांनी आपल्या भाषणात ग्रामिण भागातील नवोदीत लेखक कवींमध्ये जाणीव जागृती व्हावी म्हणून अशा संमेलनाची आवश्यकता असून साहित्य संमेलनाकडे तरूणांचा ओढा वाढत असल्याचे सांगताना सध्याच्या काळात साहित्याची परिभाषा बदलत असून अभिजात साहित्य वाचनाकडे नव्या पिढीचे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या पिढीला अभिजात साहित्याकडे आणण्याचे काम अशा संमेलनातून केले जाईल् असे त्या म्हणाल्या.
आपल्या उद्घाटनपर भाषणात दि. बा. पाटील म्हणाले कि, गावो गावी साहित्य संमेलन झाली पाहिजेत त्यातून अभिजात साहित्याचा जागर होईल. माणसाला माणूस म्हणून घडविण्याचे आणि समाजाला दिशा देण्याचे काम होईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा तो तिचा हक्क आहे. तो मिळाला पाहिजे.मराठी भाषेत होत असलेले प्रदुषण थांबले पाहिजे. धर्म आणि जात यापेक्षा माणूस म्हणून जगावे लागेल. त्यासाठी समाजाला दिशा देणारे निर्भीड साहित्य निर्माण झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

या संमेलनात राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, जुवाठीचे माध्यमिक शिक्षक बी. के. गोंडाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रज्ञेश देवस्थळी यांनी केले तर आभार डॉ. शैलेश शिंदे देसाई यांनी मानले. यावेळी साहित्य क्षेत्राशी संबंधीत मंडळी मोठया संख्येने उपस्थीत होती.