राजापूर-जैतापूर व वाटूळ- दाभोळ मार्गावरिल प्रवास आता अधिक सुखकर आणि वेगवान

 

एशिएन डेव्हलपमेंन्ट बँकेचे १४५ कोटींचे अर्थसहाय्य

दोन्ही रस्त्याचे काम पुर्णत्वाकडे प्रवाशांतुन समाधान

नरेंद्र मोहिते | राजापूर : राजापूर तालुक्यातील पश्चिम भागाकडील अत्यंत महत्वाच्या अशा राजापूर हातिवले मार्गे जैतापूर आणि राजापूर व लांजा तालुक्यातुन जाणाऱ्या वाटूळ ते दाभोळ या दोन महत्वपुर्ण रस्त्यांचे रूंदीकरण, डांबरीकरण व अन्य सेवा सुविधांच्या निर्मितीची कामे जवळपास ९० टक्के पुर्णत्वाला गेली आहेत. त्यामुळे राजापूर-हातिवले मार्गे जैतापूर आणि वाटूळ- दाभोळ मार्गावरिल प्रवास आता अधिक सुखकर व वेगवान आणि होणार आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेतही मोठी बचत होणार आहे. अशाच प्रकारे आधुनिकतेच्या धर्तीवर आणि मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध होऊन भविष्यात तालुक्यातील अन्य रस्त्यांच्या कामाबाबत विचार झाल्यास व त्याची अंमलबजावणी झाल्यास राजापूर तालुक्याच्या विकासात्मक प्रगतीला नक्कीच चालना मिळू शकते. मात्र यासाठी दुरदृष्टी आणि प्रबळ राजकिय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.

कोणत्याही भागाचा विकास हा त्या भागातील रस्ते, विज, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि शिक्षण सुविधा यांसारख्या बाबींवर अवलंबून असतो. राज्यातील अन्य जिल्हे व तालुक्यांच्या तुलनेत राजापूरात या सर्वच सेवा सुविधांचा अभाव आहे. राजापूर तालुक्यातील पुर्व भागापासून पार पश्चिम भागापर्यंत पाहिले की रस्त्यांची अवस्था किती दयनिय आहे हे लक्षात येते. तत्कालीन माजी मंत्री कै. भाईसाहेब हातणकर यांनी तालुक्यात खऱ्या अर्थाने रस्त्यांचे जाळे विणले, गाव तेथे रस्ता आणि वाडी तेथे एसटी सेवा याकडे त्यांनी लक्ष दिले. त्यामुळे गावागावात आणि वाडीवर लाल मातीचे रस्ते दिसू लागले. त्यानंतर तत्कालीन माजी आमदार गणपत कदम यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या मजबुतीकरण, डांबरीकरण यावर विशेष लक्ष केंद्रीत करून काम केले. यासाठी तत्कालीन खासदार निलेश राणे यांनी त्यावेळी मोठया प्रमाणावर निधी हा राजापूर तालुक्यासाठी अपलब्ध करून दिला होता. मात्र आजही जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या ताब्यात असलेले ग्रामीण व राज्य मार्ग यांची अवस्था दयनिय अशीच आहे. यात कामाचा न राखला जाणारा दर्जा आणि लोकप्रतिनिधींची उदासिनता हेच कारणीभूत आहे. गेल्या काही वर्षात तर केवळ छोटे रस्ते आणि पाखाडयांपुरताच विकास मर्यादित राहिल्याचे पहावयास मिळत आहे.

मात्र केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकारातुन आणि एशिएन डेव्हलपमेंन्ट बँकेने केलेल्या आर्थिक सहकार्यातुन राजापूर तालुक्यात पुर्णत्वास जात असलेल्या राजापूर-हातिवले मार्गे जैतापूर आणि वाटूळ- दाभोळ या दोन रस्त्यांच्या माध्यमातुन आता रस्ते असावे तर असे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनता, प्रवाशी आणि वाहन चालकांतुन उमटत आहेत. सुमारे १४५ कोटी रूपये खर्चुन निर्माण करण्यात आलेले हे दोन्ही रस्ते अद्ययावत असे असून या रस्त्यांवरिल प्रवास आता अधिक वेगवान व सुखकर असा झाला आहे.

राजापूर तालुक्यातील राजापूर-हातिवले मार्गे जैतापूर हा २३.७०० किलो मिटरचा रस्ता असून या रस्त्याचे मजबुतीकरण, रूंदीकरण, डांबरीकरण, आणि निवारा शेड, ट्रक थांबा यांसारखी कामे करण्यात आली आहे. सुमारे ६२ कोटी ६९ लाख रूपये अंदाजपत्रकिय खर्चाचे हे काम असून जवळपास ९५ टक्के काम पुर्ण होत आले आहे. या मार्गावर चार निवाराशेड बांधण्याचे काम अद्याप बाकी आहे.

या परिसरात प्रस्तावित असलेल्या जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पामुळे या परिसराला भविष्यात विशेष महत्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे नव्याने झालेला हा रस्ता या भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. भविष्यात अणूऊर्जा प्रकल्प मार्गी लागल्यास या मार्गाला विशेष महत्वही प्राप्त होणार आहे. त्यामुळे हा मार्ग महत्वाचा मानला जात आहे.

तर राजापूर व लांजा तालुक्यातुन जाणारा व पुढे साखरपा आंबाघाट मार्ग पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा वाटूळ- दाभोळ हा रस्ता देखील पुर्णत्वाकडे जात आहे. वाटूळ दाभोळ हा मार्ग २८.१०० किलोमिटर लांबीच्या या रस्त्याचेही मजबुतीकरण, रूंदीकरण, डांबरीकरण, पुलांची उंची वाढविणे, नवीन पुल बांधणे आणि निवारा शेड, ट्रक थांबा यांसारखी कामे करण्यात आली आहेत. या रस्त्यामुळे राजापूरकडून वाटूळ, भांबेड मार्गे दाभोळ, साखरप्यावरून पुढे आंबा घाट मार्गे पश्चिम महाराष्ट्राकडे जाणे अधिक सोपे आणि वेळेची बचत करणारे झाले आहे.

या दोन्ही रस्त्यांची कामे अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आली असून रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम दर्जेदार आहे. तर या रस्त्यांवर बांधण्यात आलेल्या निवारा शेड, मालवाहू गाडयांसाठी तयार करण्यात आलेले थांबे, साईटपट्टया, या रस्त्यांच्या मध्ये व दोन्ही बाजुला मारण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या पट्टया, रस्त्यांच्या दोन्ही बाजुला लावण्यात आलेले दिशादर्शक फलक, धोकादायक वळण, शाळा, घाट, पुल यांची माहिती देणारे फलक, झेब्रा क्रॉसिंग ब्लींकर्स यामुळे या रस्त्यांच्या आणि परिसराच्या सौंदर्यात भर पडत आहे.

या दोन्ही रस्त्यांची कामे ही एस.एस. अलुर कंट्रक्शन कंपनी आणि एन. एस. नाईक सन्स यांनी केली आहेत. तर राजापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी, शाखा अभियंता यांनी या कामावर विशेष लक्ष केंद्रीत करून अधिक दर्जेदार काम करून घेण्यावर भर दिला आहे. तर वाटूळ दाभोळ मार्गाच्या कामाच्या पुर्ततेत लांजा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी, शाखा अभियंता यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. या दोन्ही रस्त्यांची पुढील पाच वर्षासाठी देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी ही एस.एस. अलुर कंट्रक्शन कंपनी आणि एन. एस. नाईक सन्स या कंपनीची रहाणार आहे. तर या रस्त्यासाठी एशिएन डेव्हलपमेंन्ट बँकेने निधी उपलब्ध करून दिला असल्याने बँकेच्या कामाबाबतच्या नियम व निकषाचे काटेकोर पालन करण्यात आले आहे.

या दोन्ही रस्त्यांच्या पुर्ततेने तालुक्याच्या वैभवात भर पडली आहे. वेगळया प्रकारे तयार करण्यात आलेले हे दोन्ही रस्ते या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुखद असा अनुभव देणारे आहेत. भविष्यात अशाच प्रकारे तालुक्यातील प्रमुख रस्त्यांचे अत्याधुनिक पध्दतीने नुतनीकरण होणे आवश्यक असून त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न व पाठपुरावा करणे आवश्यक आहे.