रिफायनरी प्रकल्पासाठी जागा निश्चित करणे ही धोरणात्मक बाब

त्याबाबतचा निर्णय हा शासनस्तरावर होईल

औद्योगिक विकास महामंडळ भूसंपादन विभागाचे महाव्यवस्थापक संदीप आहेर यांचे पत्र

राजापूर | प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात प्रस्तावित असलेल्या हरित रिफायनरी प्रकल्पकरीता प्राथमिक सुसाध्यता सर्वेक्षणाचे काम (ड्रोन सर्व्हे व माती परिक्षण) मे. रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल लि. यांच्यामार्फत शेतकऱ्यांकडून संमत्तीपत्र प्राप्त करून घेवून औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने मे २०२३मध्ये काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्राथमिक सुसाध्यता सर्वेक्षणाचे कामाचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र या रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करणेसाठी जागा निश्चीत करणे ही धोरणात्मक बाब असून त्याबाबतचा निर्णय शासनाच्या स्तरावरील आहे अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या भू संपादन विभागाचे महाव्यवस्थापक संदीप आहेर यांनी धोपेश्वर बारसू-गोवळ दशक्रोशी रिफायनरी समर्थन समितीला दिले आहे.
राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ ग्रामस्थांची व जमीन मालकांची सहमती असल्याबाबत धोपेश्वर बारसू गोवळ दशक्रोशी रिफायनरी समर्थन समिती यांनी १६ डिसेंबर २०२२ रोजीच्या मुख्यमंत्री यांना निवेदन दिले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने शासनाकडून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानुसार महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या भू संपादन विभागाचे महाव्यवस्थापक संदीप आहेर यांनी या प्रकल्पाच्या भू संपादनाबाबत असलेली व रत्नागिरी ग्री रिफायनरी पेट्रोकेमिकल लि. प्रकल्पाची सद्य:स्थिती या पत्राने कळविली आहे. २६ डिसेंबर २०२३ रोजी तसे पत्र आहेर यांनी पाठविले आहे.

राजापूर तालुक्यातील मौजे-बारसु, मौजे-सोलगांव, मौजे वरचीवाडी (गोवळ) मौजे-खालचीवाडी (गोवळ), ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील प्रस्तावित खाजगी ८९३.८३५ हे.आर. व सरकारी ४२.३९० हे.आर. अशा एकुण ९३६.२२५ हे.आर. क्षेत्रास म.औ. वि. अधिनियम १९६१ अन्वये प्रकरण ६ व खंड २ (ग) ची अधिसूचना शासन राजपत्रात दि. २४ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.कलम ३२ (२) ची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये दि. १२-१८ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध करणेत आली आहे.सदर क्षेत्र Pass through पद्धतीने संपादन करणेबाबत महामंडळ स्तरावरुन निर्णय घेण्यात आला.

मे. रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल लि. कंपनी, जिल्हाधिकारी, रत्नागिरी तसेच संबंधित अधिकारी यांनी गावांच्या ग्रामस्थांसोबत बैठक आयोजित करुन सदरचा प्रकल्प पर्यावरण पूरक असून त्यापासून ग्रामस्थांना व जमिन मालकांना कसा फायदा होणार आहे याबाबत चर्चा केली.
प्रस्तावित हरीत रिफायनरी प्रकल्पामधील मूळ रिफायनरी करीता ६ गावामधील मौजे बारसू, वरचीवाडी (गोवळ), खालचीवाडी (गोवळ), गोवळ, धोपेश्वर, पन्हाळे, येथील अंदाजे ५५०० एकर क्षेत्र व कुड ऑईल टर्मिनल (COT) करीता नाटे वाडा तिवरे, वाडा पानेरी या गावातील अंदाजे १२०० एकर क्षेत्राचे अधिग्रहण करण्याचे विचाराधिन आहे.
प्रस्तावित हरित रिफायनरी प्रकल्पाच्या प्राथमिक सुसाध्यता सर्वेक्षणाचे कामकाज माहे मे २०२३ मध्ये सुरु करणेत आले होते. त्यावेळी सदर कामास स्थानिक नागरिकांनी व काही संघटनांनी विरोध केलेला होता. तथापि हरीत रिफायनरी प्रकल्पकरीता प्राथमिक सुसाध्यता सर्वेक्षणाचे काम (ड्रोन सर्व्हे व माती परिक्षण) मे. रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल लि. यांच्यामार्फत शेतकऱ्यांकडून संमत्तीपत्र प्राप्त करून घेवून महामंडळाच्या सहकार्याने माहे मे २०२३मध्ये काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र या प्राथमिक सुसाध्यता सर्वेक्षणाचे कामाचा अहवाल अप्राप्त आहे.

मात्र या रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करणेसाठी जागा निश्चीत करणे ही धोरणात्मक बाब असून त्याबाबतचा निर्णय शासनाच्या स्तरावरील आहे आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या भू संपादन विभागाचे महाव्यवस्थापक संदीप आहेर असे स्पष्टपणे कळविले आहे. तसे पत्र त्यांनी धोपेश्वर बारसू गोवळ दशक्रोशी रिफायनरी समर्थन समिती यांना दिले आहे.