… गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला ठोकले टाळे

मानधन तत्वावरील शिक्षकांच्या रखडलेल्या मानधनाबाबत प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करताना दिपक नागले व अन्य.
मानधन तत्वावरील शिक्षकांचे मानधन रखडले 
सत्ताधारी पक्षाच्या तालुका अध्यक्षांनी मानधन देण्याच्या आश्वासनानंतर टाळे उघडले

राजापूर | वार्ताहर : तुटपूंज्या मानधनामध्ये समाधान मानीत काम करतो, तोही तुटपूंजा पगार तीन-तीन महिने मिळत नसेल तर, कुटुंबाचा रहाटगाडा चालवायचा कसा ? नेमकं जगायचं कसं ? अशा शब्दामध्ये संताप व्यक्त करीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दिपक नागले यांनी मानधन तत्वावर नेमणूका केलेल्या शिक्षकांसमवेत पंचायत समितीच्या शिक्षण विभागावर धडक देत शिक्षण विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले. जोपर्यंत बँक खात्यामध्ये मानधन जमा होत नाही तोपर्यंत कार्यालयाला ठोकलेले टाळे काढणार नसल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला. गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या केबिनला अनाचक केलेल्या कुलूपबंद प्रकरणामुळे पंचायत समितीच्या शिक्षण विभागासह जिल्हा परिषद प्रशासनामध्ये खळबळ उडाली. मात्र सांयकाळी उशिराने मानधन तत्वावरील शिक्षकांचे दाने महिन्याचे मानधन जमा झाले असल्याने दिपक नागले यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे टाळे उघडले असून आंदोलन मागे घेतले. यावेळी दिपक नागले यांनी प्रभारी गटविकास अधिकारी परेश सुर्वे, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांचे आभार मानले. तर उर्वरित एका महिन्याचे मानधन लवकरच जमा हाईल असे आश्वासन दिले असल्याची माहीती दिपक नागले यांनी दिले.
तर सत्ताधारी पक्षाचे तालुका पदाधिकारी असलेल्या नागले यांनी अशा प्रकारे शासकिय कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन केल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत असून नागले यांनी या प्रश्नी त्यांच्याच पक्षाचे पालकमंत्री व शिक्षणमंत्री यांच्याकडे दाद मागायला हवी अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मात्र राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता असून मुख्यमंत्री, जिल्याचे पालकमंत्री व राज्याचे शिक्षणमंत्रीही शिवसेना पक्षाचे आहेत. असे असतानाही सत्ताधारी पक्षाच्याच तालुका अध्यक्षांनी अशा प्रकारे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याने ही राजकिय स्टंटबाजी नेमकी कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती श्री. नागले यांनी मानधन तत्वावरील शिक्षकांसमवेत प्रभारी गटविकास अधिकारी परेश सुर्वे, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांच्याशी रखडलेल्या मानधनाविषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी नेमके मानधन का रखडले ? असा सवाल श्री. नागले आणि मानधन तत्वावरील शिक्षकांनी उपस्थित केला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री. भोसले यांनी तालुक्यातील शिक्षकांच्या मानधनाचा प्रस्ताव वा सविस्तर अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आल्याची माहिती देताना श्री. भोसले यांच्यासह गटविकास अधिकारी श्री. सुर्वे यांनी कोणताही आक्रमक पवित्रा न घेण्याची विनंती केली.
यावेळी श्री. नागले यांच्यासमवेत शिवसेनेचे पदाधिकारी नाना कोरगावकर, मनोज आडविलकर, प्रशांत गावकर यांच्यासह कृषी विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे आदी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडून शिक्षक भरती झालेली नाही. त्याचवेळी वयोमानानुसार गेल्या काही वर्षामध्ये मोठ्यासंख्येेन शिक्षक निवृत्त झाले आहे. तर, काहींनी जिल्हा बदली करून घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्यासंख्येने शिक्षकांची पदे रिक्त आहे. अनेक शाळा एक शिक्षकी झाल्या आहेत. त्यातून, शिक्षकांभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. त्यानंतर, जिल्हा परिषदेने मानधन तत्वावर शिक्षकांची भरती केली. त्यानुसार नियुक्ती मिळालेले शिक्षक त्या-त्या शाळांवर कार्यरत आहेत. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून या शिक्षकांना मानधनाची प्रतिक्षा राहीलेली आहे. प्रलंबित असलेल्या मानधनाचा प्रश्न निकाली निघावा म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी शिक्षण सभापती आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. नागले यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीला धडक दिली.
आधीच तुटपूंजे तेही तीन-तीन महिने मानधन मिळत नसेल तर, नेमके जगायचं कसं ? असा सवाल उपस्थित करीत श्री. नागले, शिवसेनेच्या पदाधिकारी आणि मानधन तत्वावरील शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या केबिनला टाळे ठोकले. या घटनेमुळे तालुक्यासह शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली आहे. मात्र राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता असून मुख्यमंत्री, जिल्याचे पालकमंत्री व राज्याचे शिक्षणमंत्रीही शिवसेना पक्षाचे आहेत. असे असतानाही सत्ताधारी पक्षाच्याच तालुका अध्यक्षांनी अशा प्रकारे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.