कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे निबंध स्पर्धा

कणकवली : कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे विद्यार्थ्यांसाठी कणकवली तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्रे देवून पत्रकार पुरस्कार वितरण सोहळयात गौरविले जाणार आहे.

कणकवली तालुका पत्रकार समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पहिला गट- ५ वी ते ८ वी – विषय – स्वच्छता एक मिशन, माझ्या संकल्पनेतील आदर्श गाव. ( शब्द मर्यादा ६०० ते १००० ), गट दुसरा – ९ वी ते १२ वी – विषय-जलसंवर्धन काळाची गरज, मोबाईल नसता तर… ( शब्द मर्यादा ८०० ते १२०० ). गट तिसरा १3 वी ते पदवीधर – विषय – भारताची महासत्तेकडे वाटचाल, प्लास्टिक मुक्त भारत (शब्द मर्यादा १००० ते १५०० ). दोनपैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे.

पहिल्या गटासाठी अनुक्रमे रोख रु. ५००, रु. ३००, रु. २०० व प्रशस्तीपत्र, दुसर्‍या गटासाठी रोख रु. ७००, रु. ५००, रु. ३०० व प्रशस्तीपत्र आणि तिसर्‍या गटासाठी रोख रु. १०००, रु. ७०० व रु. ५०० व प्रशस्तीपत्र अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

तरी विद्यार्थ्यांनी आपले निबंध सुवाच्य व स्वहस्ताक्षरात आपल्या नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबरसह येत्या १५ जानेवारीपर्यंत पुढारी जिल्हा कार्यालय, कणकवली ( बस स्थानकासमोर ) किंवा अशोक करंबेळकर, कणकवली यांच्याकडे आणून द्यावेत असे आवाहन कणकवली तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अजित सावंत, सचिव माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे व पत्रकार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.