पांडव कालीन टाकेश्वर मंदिराचे इमारतीचे नुतनीकरणाचे खोदकामात सापडल्या पुरातन मुर्ती
मंडणगड | प्रतिनिधी : टाकवली येथील भगवान शिव शंकराचे पुरातन पांडव कालीन टाकेश्वर मंदिराचे इमारतीचे नुतनीकरणाचे काम सुरु असताना सुरु असलेल्या खोदकामात विरगळ, सतीची शिळ, व पांडवकालीन मंदिरपुर्वी अस्तिस्वात असलेल्या मंदिराचे इमारतीचे भग्न अवशेषही येथे काम करीत असलेले ग्रामस्थांना आढळून आलेले आहेत. त्यामुळे मानवी संस्कृतीचे अस्तित्वाचे भुतकाळातील खुणांच्या संशोधनात्मक अभ्यासाची आवश्यकता नव्याने अधोरेखीत झाली आहे. यंदाच्या महाशिवरात्री उत्सवाचे पार्श्वभुमीवर टाकवली येथील भगवान शिव शंकरांचे पुरातन टाकेश्वर मंदिराचे इमारतीचे बाजूने जुने बांधकाम तसेच ठेवून आर.सी.सी. कॉलम टाकून मंदीर नुतनीकरणाचे काम ग्रामस्थांच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. या निमीत्ताने करण्यात आलेल्या खोदकामात कोकणातील मंदिराच्या परिसरात सापडणाऱ्या काळ्या दगडावर कोरलेल्या मुर्तीचे दोन नमुने सापडले आहेत. यात विरांच्या स्मरणात काळ्या दगडावर कोरण्यात येणारी विरगळ व युध्दानंतर सती जाणाऱ्या स्त्रीयांच्या स्मरणातील सती शिळाही आढळून आली आहे. कोकणात आढळणाऱ्या विरगळ या काळ्या दगडावरील शिल्पासंबंधी विविध मान्यता आहेत. यात शिल्प अभ्यासकांमध्ये काही मुद्यावर साम्य असले तरी माहीतीचे सादरीकरण मात्र वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. टाकवली येथील शंकराचे मंदिर हे सर्वात जुने म्हणजे पांडवकालीन असल्याची ग्रामस्थांची मान्यता आहे. याशिवाय मुर्ती संदर्भातही गुराखी व गाईची अख्याईका सर्वामान्य आहे. या संदर्भातील लोकमान्यता व उपलब्ध माहीतीचे संदर्भ जोडता पांडवाच्या आधीही येथे शंकराची मुर्ती व मुर्तीचे संरक्षणाकरिता मंदिर असल्याची बाब या निमीत्ताने पुढे येत आहे. दोन भिन्न कालखंडातील धागे एकेमेकांशी जुळवत या संदर्भातील विश्वसनीय माहीती पुढे आणण्यासाठी मंदिराचे परिसरात खोदकाम करीत असताना नव्याने सापडलेल्या मुर्तीचे संशोधन होण्याची आवश्यकता आहे. सापडलेल्या मुर्ती या मंदिरात ठेवून त्यांचे जतन करुन हा प्राचीन पुरातन ठेवा येणाऱ्या पिढीस पहाता यावा त्यातून आपली संस्कृती समजवून घ्यावी या हेतू उद्देशाने संरक्षीत करण्यात येणार असल्याची माहीती ग्रामस्थांकडून मिळाली आहे.











