दापोली | प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दापोली तहसिलदार यांना निवेदन देत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या घटनेचा दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते.
पत्रकारांवर होत असलेले हल्ले हे पुर्वनियोजित असल्याचे दिसून येत असल्याने या घटनांचा निषेध करावा तितका कमी आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार हे आपल्या पत्रकारीतेचे काम प्रामाणिकपणे करीत असतात. परंतु काहीवेळा पत्रकारांवरच हल्ल्याच्या घटना घडत असतात. या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे पत्रकारांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याची भावना परिषदेचे दापोली तालुकाध्यक्ष श्री. शैलेंद्र केळकर यांनी यावेळी बोलून दाखवली.
पत्रकारांवर हल्ले करून एकप्रकारे पत्रकारांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जात असुन याला कुठेतरी आळा बसणे आवश्यक बनले आहे. पत्रकार हल्लाविरोधी कायदा करण्यात आला आहे. परंतु या कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा पत्रकारांमधून यावेळी व्यक्त करण्यात आली. राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यू प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.