रत्नागिरीत भारतीय तटरक्षक अवस्थानतर्फे रक्तदान शिबीर

रत्नागिरी | प्रतिनिधी : भारतीय तटरक्षक दल हे देशाच्या सागरी क्षेत्र आणि किनारी क्षेत्राभोवती सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नोडल यंत्रणा असल्याने त्यांची देशाच्या नागरिकांबाबतही मोठी जबाबदारी आहे. जनतेमध्ये रक्तदानाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि स्वेच्छेने केल्याजाणाऱ्या रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीद्वारा शासकीय जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांच्या समन्वयाने भारतीय तटरक्षक दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून 11 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यात त्यांच्या जवानांव्यातिरिक्त सैन्य अभियांत्रिकी सेवा, एन सी सी आणि इतर कॉर्पोरेट क्षेत्रासह विविध संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

तटरक्षक दल रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर उप महानिरीक्षक शत्रुजित सिंग यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. वैद्यकीय, पॅरामेडिकल कर्मचारी, रक्तपेढी आणि रत्नागिरी शासकीय जिल्हा रुग्णालय येथील प्रतिनिधींनी सर्व आवश्यक वैद्यकीय खबरदारीसह रक्त संकलित केले.वर्धापदिनानिमित्त रक्तदान शिबीर राबविण्याची संकल्पना आणि कार्यक्रमाचे एकूण नियोजन याबद्दल रुग्णालय कर्मचारी आणि रक्तदात्यांनी तटरक्षक दलाचे कौतुक केले. शिबिरात एकूण 30 युनिट रक्त संकलित करण्यात आले. भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर यांनी देखील भारतीय तटरक्षक दलास हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दिलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल रक्तपेढीतील कर्मचारी आणि वैद्यकीय पथक यांचे आभार मानले.