लोकसभा उमेदवारीबाबत भाष्य टाळले
महायुतीचे दुत म्हणून काम करण्याचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला मंत्र
राजापूर (प्रतिनिधी): सर्वसामान्यांसाठी काम करणारे आणि एक संयमी नेतृत्व अशी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची प्रतिमा आहे. सोमवारी शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियान सभेसाठी राजापुरात आलेल्या मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात ती पुन्हा एकदा दाखवून दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर शिवसेनेकडून दावा केला जात आहे. इच्छुकांकडून यासाठी मोर्चेबांधणीही केली जात आहे. सोमवारी राजापुरात झालेल्या या शिवसंकल्प अभियानात शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत इच्छुकांना प्रमोटही करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे काय बोलणार याबाबत साऱ्यानांच उत्सुकता होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात लोकसभा उमेदवारीबाबत कोणतेही भाष्य न करता फिर एक बार.. मोदी सरकार आणि अब कि बार महाष्ट्रातुन ४५ महायुतीचे ४५ खासदार पार असा नारा देत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महायुतीचे दुत म्हणून काम करण्याचा कानमंत्री दिला. त्यामुळे शिंदे यांनी अशा प्रकारे भूमिका घेत जणू महायुतीचा धर्म पाळल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियान सभेसाठी राजापुरात आलेल्या मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे सोमवारी राजापुरा आले होते. राजापूरात वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रिडांगणावर ना. शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची ही भव्य सभा झाली. या सभेची जय्यत अशी तयारी शिवसेनेकडून करण्यात आली होती. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी ही सभा होती.
या सभेत प्रारंभी बोलताना राज्याचे शिक्षणमंत्री ना. दीपक केसकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक करत सिंधुदुर्ग जिल्हयातील काही प्रलंबीत कामांची माहीती दिली. तर आगामी लोकसभा निवडणूकीत ही जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी करताना सिंधूरत्न समिती सदस्य व प्रसिध्द उद्योजक किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातुन खासदार म्हणून दिल्लीत जावेत अशी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची स्पष्ट भूमीका मांडली.
तर राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी देखील या लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीत ही जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी केली. या मतदार संघातुन शिवसेनेकडून रवींद्र फाटक, दीपक केसरकर व किरण उर्फ भैय्या सामंत असे तीन जण इच्छुक असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. मात्र याबाबत आमचे मुख्य नेते व राच्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील व महायुतीचा जो उमेदवार देतील त्याला आंम्ही निवडून आणू अशी ग्वाही दिली.
मात्र आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवारीबाबत स्पष्टपणे बोलणे टाळले. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना शासनाच्या विविध योजना आंम्ही जनतेपर्यंत पोहचवत असल्याचे नमुद करत त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा आढावा घेतला. तर मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना पक्ष संघटनाही अधिक बळकट केली पाहीजे यासाठी हे शिवसंकल्प अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी काश्मिर मधील ३७० कलम, राम मंदिराची निर्मिती, देशातील गोरगरिब जनतेला केला जात असलेला मोफत अन्न धान्य पुरवठा, शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना कशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्यक्षात उतरविल्या याची माहिती देताना मोदींनी देशात लोकसभा निवडणूकीत जो ४०० पार चा नारा दिला आहे तो आपल्याला पुर्ण करावयाचा असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले आहे हे लक्षात ठेवा असे नमुद करत फिर एक बार.. मोदी सरकार.. आणि अब कि बार महाष्ट्रातुन ४५ महायुतीचे ४५ खासदार पार असा नारा देत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महायुतीचे दुत म्हणून काम करण्याचा कानमंत्री दिला. त्यामुळे शिंदे यांनी अशा प्रकारे भूमिका घेत जणू महायुतीचा धर्म पाळल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
आपल्या भाषणात कोणतीही वैयक्तीक टिका टिपणी न करता मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी केंद्र व राज्य सरकार कसे काम करत आहे आणि पुन्हा आपल्याला कशा प्रकारे केंद्रात आणि राज्यात काम करणारे आपले महायुतीचे सरकार आणवयाचे आहे यासाठी काम करा असे कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी अहोरात्र काम करणारे आणि संयमी नेतृत्व याची प्रचिती ना. शिंदे यांनी आपल्या कृतीतुन कोकण वासीयांना दाखवून दिली हे मात्र नक्की.












