परशुराम घाटातील संरक्षक भिंतींवर रेखाटले जातेय कोकणचे निसर्ग सौन्दर्य

खेड | प्रतिनिधी : चौपदरीकरण झालेला मुंबई गोवा महामार्ग प्रवासाचा आनंद देईलच; पण प्रवाशांना कोकणात आल्याचा अनुभव देण्यासाठी परशराम घाटातील संरक्षक भिंतीवर ‘कोकण’ रेखाटण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे घाटातील वाट बिकट असली तरी नेत्रसुखद ठरणार आहे. परशुराम घाटातील दुसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही दरडीच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक सुरू झालेली नाही.
हे चौपदरीकरण गेली १७ वर्षे रखडले. अजूनही ते पूर्णत्वास गेलेले नाही. परशुराम घाटात, तर अनेक अडथळ्यांचे डोंगर उभे राहिले. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजेच टेकडीवर आणि दरीच्या पायथ्याला नागरी वस्ती आहे. पावसाळ्यात दोन्ही बाजूने दरडी कोसळत असल्याने परशुराम घाटातील वाहतूक धोकादायक झाली होती. येथील डोंगर कटाईचे काम तीन ते चार वर्षे सुरू होते. घाटातील धोकादायक वळणाच्या ठिकाणचा कातळ फोडण्यातच बराच काळ गेला.
पावसाळ्यात कोसळलेली दरड हटवण्यात बरेच दिवस गेले. नंतर लगतच्या डोंगर कटाईचे काम पूर्ण करण्यात आले. आता आवश्यक तेथे संरक्षक भिंत उभारून घाटातील दुसरी मार्गिका लवकरच खुली होईल.या संरक्षक भिंतीवर कोकणचा निसर्गसौंदर्य रेखाटला जात आहे. समुद्रकिनारा, नौका, भातशेती, नांगरणी, सुवार, मासेमारी या चित्रांच्या माध्यमातून कोकणचे सौंदर्य प्रवाशांना भुरळ घालेल. मुंबईतील एका आर्ट एजन्सीमार्फत हे काम सुरू आहे.