मुलुंड येथे आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन

पाच जिल्ह्यातून येणार कुणबी समाज बांधव

चिपळूण (वार्ताहर) : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या वतीने मुलुंड मुंबई येथे उभारण्यात आलेल्या कुणबी विद्यार्थी वस्तीगृहाचे उद्घाटन रविवार दि. १४ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघ अध्यक्ष भूषण बरे असतील.

कुणबी समाजाच्या स्वप्नातील भव्य वास्तू मुलुंड येथे उभारण्यात आली आहे. कुणबी समाजोन्नती संघ मुंबईच्या माध्यमातून गेले चार ते पाच वर्ष मुलुंड येथे कुणबी विद्यार्थी वस्तीगृह व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई उपनगर व ग्रामीण भागातील सर्व समाज बांधवांच्या प्रयत्नातून मुलुंड येथे वसतीगृह उभारण्यात आले आहे .अनेकांनी यासाठी आर्थिक सहकार्य केले आहे.

याच वास्तूचे उद्घाटन रविवार दि. १४ रोजी मुलुंड येथे होत आहे .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, माजी ऊर्जा मंत्री अनंत गीते, राष्ट्रवादीचे संस्थापक शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, उद्योग मंत्री उदय सामंत, काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले, खा. सुनील तटकरे, इतरमागास वर्ग मंत्री अतुल सावे, खा. मनोज कोटक, सुजित झिमन, मिहिर कोटक, चंद्रकांत बावकर, दत्ताजी देसाई असे अनेक राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यातून समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुलुंड येथे कुणबी समाजाच्या वतीने जनसागर लोटणार आहे. समाजाची अस्मिता जागवण्यासाठी आणि आपला स्वाभिमान होण्यासाठी मुलुंड येथे कुणबी समाज बांधव मोठ्या प्रमाणात गर्दी करणार आहे. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघाध्यक्ष भूषण बरे आणि सरचिटणीस अरविंद डफले यांनी केले आहे.