वेंगुर्ले येथे “अयोध्या” या महानाट्याचा भव्य शुभारंभ

जय श्री राम नामाने अवघ नाट्यगृह झाल राममय

प्रभू रामचंद्राच्या आदर्श मार्गांवर आपण चाललो तर खऱ्या अर्थाने रामराज्याचे पाईक ठरू : कोकण प्रांताचे सहसंघचालक बाबा चांदेकर

वेंगुर्ले : दाजी नाईक
आपण सर्वजण येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पुढे जात आहोत. राम म्हणजे मंगलमय, पवित्र्यतेचे, सद्गुणांचे, समर्पणाचे वातावरण. प्रभू रामचंद्रानी जे आदर्श प्रस्थापित केले त्या मार्गांवर आपण चाललो तर खऱ्या अर्थाने आपण रामराज्याचे पाईक ठरू असे प्रतिपादन राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांताचे सहसंघचालक अर्जुन उर्फ बाबा चांदेकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना व्यक्त केले.

सिंधुसंकल्प अकादमी व सागर एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले नगरपरिषदे च्या नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे आज १५ जानेवारी रोजी “अयोध्या” या महानाट्याचा शुभारंभ प्रयोग सादर झाला. या महानाट्याचे उदघाट्न श्री. चांदेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व श्रीरामांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लवू महाडेश्वर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी , वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, युवा नेते भाई सावंत, वारकरी संप्रदायाचे श्री. कुर्ले बुवा, भागवत प्रबोधिनीचे संजय पुनाळेकर, भाजपा महिला माजी जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, नाटकाचे निर्माते प्रणय तेली आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यामुळे परिवर्तन पहायला मिळत असून नवीन पर्व सुरु होत आहे,असे विचार व्यक्त केले. तर निर्माते प्रणय तेली यांनी अयोध्या महानाट्याबाबत रूपरेषा स्पष्ट केली. तसेच माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी आपल्या कारकिर्दीत अप्रतिम असे नाट्यगृह उभारले असून आज त्याचा फायदा होत आहे, असे सांगितले. माजी आ. राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त करून या नाटकाला शुभेच्छा दिल्या आणि रामाचे आदर्श जपणारे कार्यक्रम सिंधुदुर्गात होताहेत, हे निश्चितच अभिमानास्पद आहे, असे ते म्हणाले. यावेळी कार सेवकांच्या कामगिरीबद्दल गौरव गार काढून आयोजकांतर्फे प्राथमिक स्वरूपात यावेळी उपस्थित असलेले श्री. बागलकर गुरुजी आणि गजानन दामले यांचा त्यांच्या योगदानाबद्दल शाल, श्रीफळ व राममंदिर प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रसन्ना देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्तविक मयूर खानोलकर , स्वागत प्रसन्ना देसाई , सूत्रसंचालन शशांक मराठे यांनी केले.