रत्नागिरी : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिर नवनिर्मिती आणि प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा या निमित्त प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या गेलेल्या येथील श्री विठ्ठल मंदिरात आनंदोत्सवाचे आयोजन केले आहे. मंदिरात विद्युत रोषणाई व गीतरामायण लावले जाणार आहे. रांगोळ्यांनी मंदिर परिसर सजणार आहे.
हिंदू बंधू भगिनींच्या आणि श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमाद्वारे आनंदोत्सव साजरा होणार आहे. पहाटे नित्य काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरवात होईल. ७.३० ते ९.०० पर्यंत श्री विठ्ठल रखुमाई मूर्तीवर पंचसूक्त पवमान अभिषेक, महापूजा होईल. या करिता राजन फाळके सपत्नीक महापूजेला बसतील. ९.०० वाजता श्रीराम प्रतिमा पूजन सर्वांचे हस्ते होईल. सकाळी ९.०० ते ९.१५ श्री अथर्वशिर्ष पठण, ९.१५ ते ९.३० श्री रामरक्षा स्तोत्रपठण, ९.३० ते १०.३० श्रीराम जयराम जयजयराम जप होईल. पठण कार्यक्रमासाठी श्रीमती फडके (86058 00948) यांच्याशी संपर्क साधावा. १०.३० ते १०.४५ श्री मारुती स्तोत्र पठण, ११.०० ते १.३० प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व घंटानाद, ढोलवादन होईल.
दुपारी ३.०० ते ६.०० वेळेत महिलांसाठी हळदी कुंकू, विविध भजने, ६.३० ते ८.०० नित्य आरती श्रीसाईबाबा, श्रीस्वामी समर्थ, आणि श्री विठ्ठल-रुखुमाईच्या आरत्या होतील. सकाळी ११.०० ते सायं. ६.०० पर्यंत तीर्थप्रसाद वाटप होईल. २० ते २२ जानेवारीदरम्यान दररोज मंदिरात गीतारामायण लावले जाईल. तीन दिवस विद्युत रोषणाई केली जाईल. २२ जानेवारी रोजी रांगोळ्यांनी मंदिर व परिसर सजवला जाईल. सायंकाळी पणत्या लावून, विद्युत रोषणाई केली जाईल. बंधू भगिनी यांनी या दिवशी संपूर्ण कार्यक्रमात भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











