मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून तुमचा प्रवास आहे का ? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे

पुणे : तुम्ही जर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग रेल्वे कॉरिडोरचे काम करण्यासाठी गुरुवारी (१८ जानेवारी) एक्स्प्रेस वेवर तब्बल ६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद असणार आहे.

सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत महामार्गावर हलक्या तसेच अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरून पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी हलकी वाहने मुंबई लेन किमी ५५ वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र ४८ या मार्गावरून मार्गस्त होतील.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बस तसेच इतर हलकी वाहने मुंबई लेन किमी. ३९.८०० खोपोली एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या मार्गावरून मार्गस्त करता येतील.

त्याचबरोबर खालापूर टोल नाका शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट किमी. ३२.५०० येथून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करता येतील.

त्याचबरोबर पुण्याहून मुंबईकडे येणारी सर्व वाहने पनवेल एक्झिटवरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ या मार्गावरून करंजाडे मार्गे कळंबोली अशी मार्गस्थ करता येतील.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ या मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने शेडुंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.