कणकवली : शिवडावचे माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन नुकतेच मोठया उत्साहात संपन्न झाले. यानिमित्त आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवडाव सेवा संघ, मुंबईचे कार्याध्यक्ष मोहन पाताडे होते. अध्यक्षस्थानावरुन बोलताना त्यांनी, विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रखर ध्येयनिष्ठा व नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले.
कार्ययक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले ग्लोबल फाऊंडेश पिंगुळी, कुडाळ या संस्थेचे विभागीय संचालक प्रसाद परब यांनी मोबाईलचा घातक अतिवापर व त्याचे विद्यार्थ्यांवरील दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाला त्यांनी ५ ग्रंथ भेट स्वरुपात दिले.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम शेखरदाजी अर्थात गणेश रेवडेकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवविश्वातील किस्से सांगून खळ – खळून हसवले तसेच विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्ये वाढविण्याचा सल्ला दिला. वर्षभरात कला, क्रीडा, विदया या सर्वच क्षेत्रात चौफेर कामगिरी करणा-या विद्यार्थिनी सृष्टी तांबे, तन्वी करंगुटकर व ऋतुजा परब यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा विभागाचा चॅम्पियन संघ ‘ग्रीन हाऊस’ या संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी प्रदान करण्यात आली. स्नेहसंमेलननिमित्त वार्षिक प्रश्नमंजुषा, फनीगेम्स, शिवम हस्तलिखित, रांगोळी व चित्रकला प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश वाळके यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक मुकेश पवार यांनी केले. तर सूत्रसंचालन हरेश वाघाटे व चैतेश देसाई यांनी केले.
या कार्यक्रमाला शिवडाव सेवा संघ, मुंबईचे कार्याध्यक्ष मोहन पाताडे, शालेय समितीचे अध्यक्ष भाग्यरेखा दळवी, खजिनदार विद्याधर गांवकर, सदस्य गणेश म्हसकर, अमेय सावंत, विविध समित्यांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पालक, विद्यार्थी व ग्रमस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












