लिंग समभाव सचेतना कार्यशाळेचे कुडाळ येथे झाले उद्घाटन
कुडाळ | प्रतिनिधी : भेदभाव, असमानता हे शब्द जरी मोठी असले तरी या शब्दांचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचा आहे मुळात आपल्या घरापासून भेदभाव, असमानता याचा अर्थ आणि घरात होणाऱ्या घडामोडी यामधून शोधल्या पाहिजेत असे मत सम्यक संस्थेचे आणि पुरुष मास्टर ट्रेनर या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आनंद पवार यांनी कुडाळ येथे व्यक्त केले.
कुडाळ येथील दुर्वांकुर हॉल येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले पुरुष मास्टर ट्रेनर अशी लिंगसमभाव सचेतना कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा तीन दिवसाची आहे. शुभारंभ प्रसंगी महिला बाल विकास विभागाचे काटकर, माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, महिला आर्थिक विकास महामंडळाचे काळे, मार्गदर्शक आनंद पवार, संस्थेच्या अध्यक्षा मानसी धुरी तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयोगिनी उपस्थित होते. पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी या कार्यशाळेचे मार्गदर्शक आनंद पवार यांनी सांगितले की, कुठेही परिवर्तन हे स्वतःच्या घरापासून सुरू होत असतं लिंग समभाव सचेतना कार्यशाळा का घ्यावी लागली याचा सुद्धा विचार झाला पाहिजे महिला विविध मार्गातून प्रगती करत आहेत नोकरी, व्यवसाय, राजकारण अशा प्रमुख ठिकाणी त्या काम करत आहेत हे परिवर्तन झाले आहे. पण मानसिक स्थितीतून परिवर्तन झाले आहे का? याचा विचार झाला पाहिजे आणि त्यामुळेच लिंग समभाव सचेतना ही कार्यशाळा त्यासाठी आहे. आपण सर्व समान आहोत जशा पुरुषाला भावना आहेत अशा महिलेला भावना आहेत आणि एकामेकाच्या भावना जपणं एकामेकाला सहकार्य करून प्रगती करणे म्हणजेच लिंग समभाव मात्र अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचा आपण दिंडोरा पिटत आहोत हे कुठेतरी कमी झाले पाहिजे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार देण्यात आला आहे भेदभाव आणि असमानता याचे अर्थ समजावून घेणे महत्त्वाचे आहे त्यावेळीच समानता आणि समभाव नांदू शकतो असे त्यांनी सांगितले.
तर यावेळी माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सांगितले की, पुरुष आणि स्त्री हा नैसर्गिक लिंग भेद असला तरी समभाव निर्माण करणे हे आपल्या हाती आहे तसाच तिसरा वर्ग हा तृतीयपंथी आहे त्यांच्याबाबतही विचार होणे गरजेचे आहे. समाजात अजूनही पुरुषी अहंकार आहे तो कमी झाला पाहिजे समाज काय म्हणेल या वाक्याने सर्वांच्या जीवनाची राख रांगोळी झाली आहे समाज काय म्हणेल यापेक्षा आपण काय करतो याकडे लक्ष देणे आणि त्याची सुरुवात करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. संस्काराचे कारण पुढे करून अनेक जुन्या रुढी, परंपरा अंगीकारल्या जात आहेत किंवा त्या लादल्या जात आहेत हे चुकीचे आहे. समाजामध्ये परिवर्तन हे झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले. तर महिला बाल विकास विभागाचे काटकर यांनी सांगितले की, अनेक कायदे महिलांसाठी आहेत आणि त्या कायद्यांच्या माध्यमातून महिला न्याय मिळू शकतात आणि त्यासाठीच अशा प्रकारचे उपक्रम शासन हाती घेत आहे. महिलांचा जेव्हा सर्वांगीण विकास होईल तेव्हाच मानवी निर्देशांक वाढेल असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे श्री. काळे यांनी केले या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील सुमारे ३० पप्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.