जीवन आनंद संस्थेच्या कार्व्हर डे नाईट शेल्टरची कामगिरी

खारेपाटण : जीवन आनंद संस्थेच्या कार्व्हर डे नाईट शेल्टरद्वारे गेल्या अवघ्या १० दिवसांच्या काळात मुंबईतील पोलीस स्टेशन मधून शेल्टरमधे दाखल करण्यात आलेल्या तीन व्यक्तींचे यशस्वी कुटुंब पुनर्मिलन घडवून आणण्यात आले. यामध्ये मानसिक आजारपण व स्मृतीभ्रंशाने पिडीत असलेले दोन वयोवृध्द आजोबा व एका मानसिक आजारी व्यक्तीचा समावेश आहे.

 

सामाजिक कार्यकर्ते संदिप परब यांनी ११ वर्षांपुर्वी सुरू केलेल्या सांताक्रुज वाकोला येथील जीवन आनंद संस्थेच्या कार्व्हर डे नाईट शेल्टर माध्यमातून रस्त्यावरील निराधार व बेघर व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना माणूसकीचे सन्मानजनक जीवन मिळण्यासाठी कार्य केले जाते. मुंबई महानगर पालिके अंतर्गत पंडीत दिनदयाळ उपाध्याय शहरी बेघर निवारा केंद्र या योजनेच्या माध्यमातून कार्व्हर डे नाईट शेल्टरचे काम चालते. याकामी महापालिकेतील आधिकारी वर्गाचे कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. मुंबईतील विविध पोलिस स्टेशनच्या माध्यमातून कुटुंबातून हरवलेले वयोवृध्द नागरिक, मानसिक व शारिरीक दृष्ट्या आजारी, जख्मी व्यक्तीं ना कार्व्हर सेंटरमधे दाखल करण्यात येते. नुकतेच शनिवार दि. १३ जानेवारी, २० २४ रोजी दुपारी १२-०० चे दरम्यान गोरेगाव मोतीलालनगर येथून हरवलेले हसन सफ़ुद्दीन काझी वय वर्षेः ६६ यांना माहिम येथील शाहूनगर पोलिस स्टेशनद्वारे दि. १४/०१/२४ रोजी संध्याकाळी कार्व्हर सेंटरमधे दाखल केले.

 

हसन काझी यांनी दिलेल्या कोकणातील गावाबद्दलच्या जुजबी माहितीवरून कार्व्हर सेंटरच्या इन्चार्ज संपदा सुर्वे यांनी गुगल द्वारे प्रथम हसन काझी यांच्या रत्नागिरीतील गावचा शोध घेवून तेथून गोरेगाव येथील हसन यांची मुलगी हसिना यांचा संपर्क मिळविला. व त्यांचेशी संपर्क करण्यात यश मिळविले… नुकतेच १५ जानेवारी रोजी कार्व्हर सेंटर येथे हसन काझी यांची व मुलगी अमिना इम्रान मेमन यांची ओळख पटवून त्यांना मुलीच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान कार्व्हर डे नाईट शेल्टरद्वारे गेल्या अवघ्या १० दिवसांच्या काळात बहरिन येथून मुंबईत आलेले व मुळ पंजाब राज्यातील असलेले मानसिक आजारी व्यक्ती वीरपाल परसमलाल बागलवा (वय: ३८) यांना भाऊ संदिप यांच्या ताब्यात देण्यात आले. तर नारायण धोंडू तांबेटकर (वय: ७०) यांनाही नुकतेच त्यांच्या नातलगांच्या ताब्यात देण्यात आले. अनुक्रमे बीकेसी पोलीस स्टेशन आणि माहिम पोलीस स्टेशनने त्यांना कार्व्हर शेल्टरमधे दाखल केले होते. जीवन आनंद संस्थेच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.