आबलोली : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभाग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत शिक्षक गटातून केळकर शिक्षण संस्थेच्या विनायक गणेश वझे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मुलुंड(पूर्व),मुंबई चे शिक्षक, गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपुत्र प्रा.अमोल महादेव पवार यांचा प्रथम क्रमांक आला आहे. त्याबद्दल शिवाजी मंदिर, दादर याठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभागाच्या वार्षिक अधिवेशनात नागपूर विभागाचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार, भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते आणि कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जेष्ठ कवी अशोक नायगावकर, प्रा.अशोक बागवे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षे याविषयावर त्यांनी निबंध लिहिला होता.
त्याबद्दल महाविद्यालयात प्राचार्य प्रा.डॉ.प्रीता निलेश, उपप्राचार्य सी.ए.अनिल नाईक, उपप्राचार्य प्रा.माधुरी नगरकर, पर्यवेक्षिका डॉ.संगिता राधाकृष्णन, मराठी विषय प्रमुख दत्तात्रय गायकवाड यांसह सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.