
भजन, पूजन, नामस्मरण, शोभायात्रेसह दिपोत्सवाने प्रतिष्ठापन सोहळा उत्साहात साजरा
राजापूर (वार्ताहर): सुमारे पाचेशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रभू रामचंद्राची जन्मभूमी अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात आयोजित प्रभू रामाच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळयानिमित्त राजापूर शहर आणि तालुका परिसरात वाडिवस्तीवर आयोजित करण्यात आलेल्या भजन, पूजन, नामस्मरण, दिपोत्सवाच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तीमय व भाविक रामनामाच्या जयघोषात तल्लीन झाले होते. तर काही ठिकाणी अयोध्देतील या सोहळयाचे थेट प्रक्षेपण दाखविण्या आल्याने याची देही याची डोळा हा सोहळा पाहण्याची पर्वणी रामभक्तांनी साधली. शहर आणि तालुक्यात सर्वत्र राममय वातावरण पाहायला मिळाले. अयोध्देत हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत असताना तेवढाच उत्साह, उल्हास राजापूर शहर आणि तालुका परिसरात पाहायला मिळत होता.
सोमवारी अयोध्देतील भव्य मंदिरात प्रभू रामाच्या बालस्वरूपातील मुर्तीची प्राण प्रतिष्ठान होणार असल्याने शासन स्तरावरून शासकीय सुट्टी जाहिर करण्यात आली होती. तर या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामदेवतांच्या मंदिरामध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये तालुक्यात भक्तीमय वातावरण तयार होते. सर्वत्र प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमित्त मंदिरांमध्ये आरास सुशोभिकरण करण्यात आले होते.
सोमवारी प्राणप्रतिष्ठान सोहळा होणार असल्याने ग्रामदेवतांच्या मंदिरामंध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे तसेच शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते.सोमवारी सकाळी शहर बाजारपेठेतील श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात भगव्या पताका, मंदिर मार्गावर रांगोळया काढण्यात आल्या होत्या.
सकाळी श्री रामाच्या मुर्तीची पूजा, आरती तर संजय पेडणेकर दांपत्याने अभिषेक केला. तर या निमित्त रामयागाचे आयोजनही करण्यात आले होते. सौ. व श्री. राजेंद्र कुशे यांनी या यागाचे यजमानपद भुषविले. तर यानिमित्त याग पूजा, भजन असा सोहळा पार पडला. त्यानंतर अयोध्देतील प्राणप्रतिष्ठापना सोहळयाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. शेकडो भाविक यावेळी उपस्थीत होते. त्यांनतर घंटानाद करण्यात आला.दुपारी जवाहरचौक शिवतिर्थावरून श्री विठ्ठल मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर सामुदायिक रामनाम जप, सामुदायीक रामरक्षा पठण, आरती प्रसाद व सांयकाळी दिपोत्सव होवून कार्यक्रमाची सांगता झाली.
या सोहळयानिमित्त वातावरण भक्तीमय होवून गेले होते.तर या सोहळयानिमित्त जवाहरचौक परिसरात मातोश्री ग्रुपच्या वतीने श्रीरामांचा भव्य फलक लावण्यात आला होता. तर जवाहरचौक येथे श्रीराम व राममंदिराचे भव्य कटआऊट लावण्यात आले होते. तर रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने रिक्षाच्या पाठीमागे बॅनर व भगवाध्वज लावून सकाळी शहर बाजारपेठेतून रिक्षा रॅली काढण्यात आली.
शहराबरोबरच ग्रामिण भागात ग्रामदेवतांच्या तसेच हनुमान व राम मंदिरांमध्ये हा सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने मंदिरांची सजावट करण्यात आली होती. राम नाम जप, आरती, हरिपाठ भजन, दिंडी अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अबाल वृध्द भाविक मोठया उत्साहाने सहभागी झाले होते. सर्वत्र राममय वातावरण झाल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळत होते. शहरानजीकच्या शिळ येथील मारूती मंदिरात पूजन, आरती, हरिपाठ कार्यक्रम सादर करण्यात आले.
पाचशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राम जन्मभूमीत राम परत आल्याचा मनस्वी आनंद प्रत्येकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होता. अयोध्देत हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत असताना तेवढाच उत्साह, उल्हास राजापूर शहर आणि तालुका परिसरात पाहायला मिळत होता.
फोटो 22 आरजेपी 1/2/3/4/5/6
राजापूर शहर बाजारपेठेतील श्री विठ्ठल पंचायतन मंदिरात श्रीरामाची आरती करताना सौ. व श्री. राजेंद्र कुशे, दुसऱ्या छायाचित्रात राम याग प्रसंगी उपस्थीत भाविक. तर तिसऱ्या छायाचित्रात अयोध्देतील प्राणप्रतिष्ठापना सोहळयाचे थेट प्रक्षेपण पाहताना भाविक. चौथ्या छायाचित्रात जवाहरचौक येथुन काढण्यात आलेली शोभायात्रा तर पाचव्या छायाचित्रात शिळ भंडारवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात पौराणिक वेशात शालेय मुलांनी काढलेली शोभायात्रा तर हनुमान मंदिरात हरिपाठ सादर करताना.











