इंस्टाग्रामवर धार्मिक भावना दुखावतील अशा आशयाची पोस्ट ठेवल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

राजापूर (प्रतिनिधी):अयोध्येतील श्री राम मंदिरात प्रभू श्री रामांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापणा सोहळयाची धामधुम सुरू असताना राजापूरात काही समाजकंटक युवकांनी इंस्टाग्रामवर हिंदूच्या भावना दुखावतील व दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा आशयाची पोस्ट ठेवल्याप्रकरणी राजापूर पोलीसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी राजापूर शहरातील खडपेवाडी येथील रहिवाशी सुरज रवींद्र पेडणेकर यांनी राजापूर पोलीसांत सोमवारी रात्री तक्रार दिली आहे. याबाबतची माहिती मिळताच राजापूरातील जागरूक तरूणांनी रात्रीच पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल करत या अपप्रवृत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठा व राममंदिर उद्घाटन सोहळा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रम अनुषंगाने अनेक लोकांनी आपले मोबाईल वर श्रीराम प्राणप्रतिष्ठा व राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमित्ताने गावागावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सोशल मिडीयावर श्रीराम प्राणप्रतिष्ठा व राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे फोटो स्टेटसला ठेवले होते. अत्यंत भक्तीमय वातावरणात सर्वत्र हा सोहळा साजरा होत होता. मात्र त्याला या समाजकंटाकांनी नाहक गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे.
सोमवारी २२ जानेवारी रोजी रात्री ९ वाजताचे दरम्याने मी माझे खडपेवाडी राजापूर येथे राहते घरी असताना मोबाईलवर इंस्टाग्राम स्टोरी पाहिल्या असता काही तरूणांनी आपल्या इंस्टाग्रामवर जुन्या बाबरी मशिदीचा फोटो ठेवून उर्दु व इंग्रजी भाषेमध्ये मजकूर लिहून आक्षेपार्ह पोस्ट स्टेटस ठेवलेले आढळून आले. सदर पोस्टमुळे स्टेटसमुळे धर्म व जनसमाज यांच्यामध्ये शत्रुत्वाच्या व द्वेषाच्या भावना वाढविणे आणि एकोपा टिकण्यास बाधक अशी कृती करुन हिंदु धर्माचा व धार्मिक श्रध्दांचा दुष्ट उद्देशाने अवमान केला आहे. तरी या प्रकरणी या सहा जणांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी पेडणेकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.

या प्रकरणी राजापूर पोलीसांनी भा. द. वि. कलम १५३ अ, ५०५(२) व २९५ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.