रत्नागिरी :
रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य भाटये परिसरातील श्री देव झरी विनायक मंदिराचा जीर्णोद्धार, श्रींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा बुधवार दि.९ एप्रिल रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीतील हजारो भाविकांच्या समवेत उत्साहात साजरा झाला.
बुधवारी सकाळी जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांचे भाट्ये गावातून वाजत-गाजत मिरवणूकीने स्वागत करण्यात आले, तेव्हा सारा परिसर चैतन्यमय झाला होता. श्री झरी विनायक मंदिर हे रत्नागिरीगिरीतील एक प्रसिध्द मंदिर असून श्री देव विनायक हे जागृत दैवत असल्याची हिंदूंची श्रद्धा आहे. पर्यटक म्हणून येणारे भाविक मोठ्या श्रद्धेने श्री विनायकाच्या दर्शनासाठी वर्षभर येत असतात. समुद्र तटावर आणि अगदी रस्त्यालगत असलेल्या या मंदिराचा भव्य असा जिर्णोध्दार करण्यात आला आहे.
अतिशय देखणे असे हे मंदिर उभारण्यात आले असून या मंदिराची रचना दाक्षिणात्य शैलीत आहे. मुंबईतील स्व.वनिता सीताराम शेट्टी यांच्या स्मरणार्थ गणेशभक्त सीताराम शेट्टी यांनी आपल्या ऑनशोअर कन्ट्रक्शन कंपनी च्या सौजन्याने हे मंदिर उभारले आहे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या शुभहस्ते मंदिराचे कलशारोहण करण्यात आले. मंदिरातील सर्व विधी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या मार्गदर्शनाखाली यथोचित करण्यात आले.
सोहळ्यासाठी उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, तसेच आ.रविंद्र चव्हाण, माजी आमदार राजन साळवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष सुयोग दळी, विवेक सुर्वे, उदय बने, राहुल पंडित, सुरेश मयेकर, विजय खेडेकर, जयसिंग घोसाळे, महेश म्हाप, बिपीन बंदरकर, सरपंच पराग भाटकर, रोहिदास भाटकर, रोशन फाळके, भाजपचे पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर, झरी विनायक मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच रत्नागिरीतील भाविकही सोहळ्यास प्रचंड संख्येने उपस्थित होते.
या भव्य सोहळ्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले असून रत्नागिरी जिल्ह्य सह अनेक ठिकाणांहून भाविक आणि पर्यटक श्री विनायकाचे दर्शनासाठी आणि मंदिराचा नवा साज पाहण्यासाठी येऊ लागले आहेत.