
चिपळूण :: वाचनालयाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार हे कोकणसह बुलढाणा, नाशिक, कोल्हापूर, गोवा येथील साहित्यिकांना प्रदान होत असल्याने भविष्यात या पुरस्कारांना आवर्जून ‘राज्यस्तरीय’ म्हणायला हवे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केले.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने आयोजित कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये, कविवर्य माधव केशव काटदरे आणि कविवर्ष वि. ल. बरवे उर्फ कवी आनंद स्मृत्यर्थ वाङ्मयीन पुरस्कार वितरण समारंभात डॉ. चोरगे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर, वाचनालयाच्या पुरस्कार समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आणि समीक्षक अरुण इंगवले, लोणार बुलढाणाचे कवि डॉ. विशाल इंगोले, गोव्याचे कादंबरीकार गजानन यशवंत देसाई, आजरा कोल्हापूरचे कादंबरीकार रामकृष्ण मगदूम, चिपळूणच्या साहित्यिका संध्या साठे जोशी आणि गुहागरच्या कवयित्री ममता विचारे हे पुरस्कार प्राप्त साहित्यिक उपस्थित होते.
डॉ. चोरगे पुढे म्हणाले, हे महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार आहेत. समाजात लिहावं असं खूप असतं. आपण लिहावं असं प्रत्येकाला वाटत असतं. लेखनासाठी असंख्य विषय आपल्या आजूबाजूला आहेत. आजचं शिक्षण उलट्या दिशेने चाललंय की काय? असं वाटायला लागलं आहे. अशा काळात विविध विषयांवर समाजाला उपयुक्त असं लेखकाने लिहिलं पाहिजे आहे. आजच्या गर्दीत माणूस आणि माणुसकी हरवलेय. आजच्या शिक्षणात विद्यार्थी, पालक, शिक्षक शोधायला हवाय अशी स्थिती आहे. राजकारणात समाजकारणी शोधायला हवा आहे. अशा विविध विषयांवर लिहून लेखकांच्या लेखनाचा डोंगर होऊ द्या, कालांतराने त्या डोंगराचे उत्खनन होईल. तेव्हा आपली लेखन संस्कृती जगाला समजेल, असे चोरगे म्हणाले.
वाचनालयाचे वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या पुस्तकाचा परिचय, परिचय कर्त्यांना ग्रंथभेट, सर्व पुरस्कार्थीचा सत्कार डॉ. चोरगे सरांच्या हस्ते करण्यात आला. सर्व पुरस्कार्थांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख रक्कम, महावस्त्र, श्रीफळ, ग्रंथभेट होते. २०२१-२२ साठीचा कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये मृदंगी काव्य पुरस्कार ‘माझ्या हयातीचा दाखला’ या कविता संग्रहासाठी कविवर्य डॉ. विशाल इंगोले (लोणार, बुलढाणा) यांना प्रदान करण्यात आला.
या कवितासंग्रहाचा परिचय प्रा. संतोष गोनबरे यांनी करून दिला. २०२२-२३ साठीचा कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये मृदंगी काव्य पुरस्कार ‘आतल्या विस्तवाच्या कविता’ या कविता संग्रहासाठी कविवर्य संजय चौधरी (नाशिक) यांना प्रदान करण्यात आला. या पुस्तकाचा परिचय कवयित्री मेघना चितळे यांनी करून दिला. ‘ओरबिन’ या कादंबरीसाठी कादंबरीकार गजानन यशवंत देसाई (गोवा) यांना पुरस्कार देण्यात आला. या पुस्तकाचा परिचय प्रा. मनाली बावधनकर यांनी करून दिला. २०२२-२३ साठींचा कविवर्य द्वारकानाथ शेंड्ये मनबोली कादंबरी पुरस्कार ‘कलविण’ या कादंबरीसाठी कादंबरीकार रामकृष्ण मगदूम (आजरा कोल्हापूर) यांना प्रदान करण्यात आला. या पुस्तकाचा परिचय मनिषा दामले (प्रसिद्ध योगशिक्षिका) यांनी करून दिला. ‘लॉकडाऊन’ या कथासंग्रहासाठी साहित्यिका संध्या साठे जोशी (चिपळूण) कवी माधव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुस्तकाचा परिचय सीए अमित ओक यांनी करून दिला. कविता संग्रहासाठीचा कवी आनंद पुरस्कार सूर्योदय’ या कविता संग्रहासाठी कवयित्री ममता विचारे (गुहागर) यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या पुस्तकाचा परिचय शाहीर राष्ट्रपाल सावंत यांनी करून दिला.
कविवर्य द्वारकानाथ शेंडे यांच्या प्रतिमेस डॉ. चोरगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविकातून अरुण इंगवले यांनी पुरस्कार समिती सदस्य अंजली बर्वे, संतोष गोनबरे, राष्ट्रपाल सावंत यांचाही उल्लेख केला. त्यांनी समितीची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर आणि आभार विनायक ओक यांनी मानले.











