सावंतवाडीतील युवकाकडून दोन धर्मात तेढ निर्माण करणारी वादग्रस्त पोस्ट शेअर

हिंदू धर्मियांची पोलिस ठाण्यात धडक : गुन्हा दाखल करण्याची मागणी

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

सावंतवाडी । प्रतिनिधी : हिंदू धर्मीयांच्या भावना भडकवून दोन धर्मात तेढ निर्माण करणारी वादग्रस्त स्टोरी सोमवारी सावंतवाडीतील एका महाविद्यालयीन युवकाने सोशल मिडीयावरील आपल्या अकाऊंटवर शेअर केली. यामुळे संतप्त झालेल्या हिंदू धर्मियांनी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची भेट घेत संबंधित युवकासह पोस्ट शेअर करणाऱ्या सर्वांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

मात्र, याबाबत चौकशी सुरु आहे असे सांगत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने अखेर सायंकाळी ७ च्या सुमारास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब माजी नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका प्रचारक नितीन गावड, सकल मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धडक देत संबंधितावर तत्काळ गुन्हा दाखल करा, अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याची ग्वाही दिली.

दरम्यान, भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे, कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी केली. तर रात्री उशिरा भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेत चर्चा केली.
याबाबत पुढील निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी याबाबत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

यानंतर रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर हिंदू धर्मीय सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने हिंदू बांधव पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित होते. केतन आजगांवकर, किशोर चिटणीस सुनील सावंत, गौरव शंकरदास, कृष्णा धुळपणवार, सुधा राणे, अजय सावंत, अजित सांगेलकर, प्रतिक बांदेकर आदिसह शेकडो युवक उपस्थित होते.

संबंधित युवकाकडून यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त पोस्ट

सावंतवाडीतील एका महाविद्यालयीन युवकाने हिंदू धर्मियांच्या भावना भडकवणारी पोस्ट आपल्या सोशल मीडियातून शेअर केली. यानंतर हिंदू धर्मियांनी पोलीस ठाणे गाठत संबंधितावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, संबंधित युवकाने यापूर्वीही चार ते पाच वेळा अशाच प्रकारे काही पोस्ट शेअर केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्याच्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी जास्तीत जास्त कडक कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.