मंडणगड : प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) तालुका शाखेच्यावतीने पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष राजेश गमरे आपल्या कार्यकर्त्यांसह प्रजासत्ताक दिनी भिंगळोली येथील तहसिल कार्यालयाचे आवारात उपोषणास बसले होते. पार्टीच्या तालुकाशाखेचेवतीने तालुक्यातील दहा प्रमुख समस्यांकरिता निवेदन आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास देण्यात आला होता. या संदर्भात तहसलिदार तानाजी शेजाळ यांच्या आव्हानाला मान देवून आंदोलकांनी आठ समस्या सोडवण्याकरिता प्रशासनाकडून होत असलेली कार्यवाही लक्षात घेऊन त्या प्रश्नांचे आंदोलन स्थगित केले होते. मात्र ग्रामिण रुग्णालयात डॉक्टरांचा अभाव व म्हाप्रळ आंबेत दरम्यान नवीन पुलाचे मागणीकरिता उपोषण करण्यात आले होते. व सलग चौथ्या दिवशी म्हणजे 29 जानेवारी 2024 रोजी उपोषण सुरुच होते.
आंदोलक करीत असलेल्या मागण्या या सार्वजनीक हिताच्या असल्याने तालुक्यातूनही आंदोलनास मोठे समर्थन लाभलेले असताना आरोग्य व सार्वजनीक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ पातळीवर यंत्रणा मात्र या प्रश्नापासून दुर असल्याचे दाखवित होत्या. दरम्यान आज माजी आमदार संजय कदम, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गोवळे व समर्थकांनी आंदोलनस्थळी भेट दिली. माजी आमदार संजय कदम यांनी तहसिलदार मंडणगड यांना आंदोलन स्थळी पाचरण करुन सिव्हील सर्जन व बांधकामचे अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून उपोषण करुन माणसे गेल्यावर आपण प्रश्न सोडविणार का असा प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी 30 जानेवारी 2024 रोजी ग्रामिण रुग्णालयात एम.बी.बी.एस. डॉक्टर उपलब्ध करुन देत असल्याने लेखी पत्र उपोषण कर्त्यांना दिले, त्यामुळे राजेश गमरे यांनी आरोग्य विभागाचे विरोधातील आंदोलन तुर्तास स्थगित केल्याचे स्पष्ट केले मात्र दिलेल्या पत्राचे अनुषंगाने विभागाने कार्यवाही न केल्यास आपण आंदोलनाचे भुमीकेवर ठाम असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.
दरम्याने सार्वजनीक बांधकाम विभागाने पुलाचे प्रश्नावर आपली भुमीका स्पष्ट करुन समाधानकारक तोडगा काढल्यास दोन्ही विषयावरील आंदोलन आजच संपण्याची शक्यता आहे. सलग चार दिवस उपोषण सुरु असल्याने येथील उपलब्ध वैद्यकीय अधिकारी राजेश गमरे यांची वैद्यकीय तपासणी करत असून कालपासून श्री. गमरे यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचारांची गरजही तपासणी पथकाने व्यक्त केली. आरोग्य विभागाने पत्र दिल्याने आपण आपले आंदोलन मागे घ्यावे पुर्ण तालुका आपल्या सोबत आहे व आरोग्य विभाग डॉक्टर उपलब्ध करुन देण्याचे लेखी आश्वासन देत असल्याने आपण आंदोलन स्थगित करावे असे आवाहन आमदार संजय कदम यांनी केले. याचबरोबर आश्वासन पुर्ण न केल्यास पुर्ण तालुका आपल्या आंदोलनात आपल्या मागे उभा राहील असे आश्वासनही दिल्याने आरोग्य विभाग विरोधातील उपोषण स्थगित करण्यात आल्याचे राजेश गमरे यांनी सांगीतले.












