खेड | प्रतिनिधी : मुंबई गोवा हायवे क्र. ६६वर भरणे, खेड येथील काळकाई देवी मंदीर जप्त करण्यात आलेल्या खवले मांजराच्या खवले तस्करी प्रकरणी अजून संशयित आरोपींना अटक करण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले आहे. या तस्करी प्रकरणात आता तीन संशयित आरोपींचा सहभाग स्पष्ट झाला आहे.
मंगळवार दिनांक ३०.१.२०२४ रोजी श्री. दिपक पो. खाडे, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांना खवले मांजराचे तस्करी प्रकरणी मिळालेल्या गुप्त बातमीवरून वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी सापळा रचाला असता मुंबई गोवा हायवे क्र. ६६ भरणे, ता. खेड येथील काळकाई देवी मंदीर येथे दुपारी २.३० वाजणेच्या सुरामार एक व्यक्ती संशयितरित्या फिरताना दिसला होता. चौकशीकरीता ताब्यात घेतले असता त्याच्याजवळील निळ्या रंगाच्या फास्टट्रक बॅगेमध्ये नायालॉन बॅगेत खवलेमांजराची १.६०० कि. ग्रॅम खवले आढळून आली होती. या संशयीत आरोपीने त्यांचे नाव आतिष अशोक सोनावणे (वय ४२ वर्षे धंदा शेती रा. तुळशी बुद्रुक बौध्दवाडी ता. खेड जि.रत्नागिरी) असे सांगितले आहे.
आरोपीजवळ आढळून आलेल्या मुद्देमालाबाबत कसून चौकशी केली असता त्यांना महाड येथील मोरे नामक व्यक्तीने दि.२९.०१.२०२४ रोजी मोबाईद्वारे संपर्क करून तुळशी खिंडीजवळील गुरांच्या गोट्यात नायलॉन पिशवीमध्ये ठेवलेली वस्तु भरणे येथे जाऊन तेथे दापोलीहून येणाऱ्या एका इसमाजवळ द्यावयास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सदर गुन्ह्यातील अधिक तपासाकरीता वन विभागाचे अधिकारी / कर्मचारी यांनी मौजे तुळशी बु. ता. खेड खिंडीजवळ आज दिनांक ३१.०१.२०२३ रोजी सापळा लावला असता गुन्ह्यात सहभागी असणारे अनिल धोंडीराम जाधव (रा. नागाव ता. महाड जि. रायगड) व राजेंद्र रघुनाथ मोरे (रा. दिवीळ ता. पोलादपूर जि. रायगड) यांना ताब्यात घेणेत आले. श्री. जाधव व श्री. मोरे यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचा गुन्हा कबुल केला आहे. सदर प्रकरणातील तीन्ही आरोपींचे विरूध्द श्री.पी.एन. डोईफोडे, वनरक्षक यांनी गुन्हा नोंद केला असून तिन्ही आरोपींना अटक करून मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग ०१ खेड ता. खेडे यांचे कोर्टात दिनांक ३१.०१.२०२४ रोजी हजर करणेत आले आहे. सदर आरोपीना न्यायालयाने २ दिवसांची वन कोठडी पुढील तपासाकरीता दिली आहे. सदर प्रकरणी पुढील तपास श्री.पी.जी. पाटील परिक्षेत्र वन अधिकारी दापोली व त्यांचे अधिनिस्त कर्मचारी करीत आहेत.
सदर कारवाई दिपक पो. खाडे, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) व वै.सा. बोराटे, प्रभारी, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) यांचे मार्गदर्शनाखालील श्री.पी.जी.पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी दापोली, श्री. सुरेश उपरे, वनपाल खेड, श्री. अनिल दळवी वनपाल मंडणगड, श्री. साताप्पा सावंत, वनपाल दापोली, श्री. गणपत जलने, वनरक्षक बांधतिवरे, कु.शुभांगी भिलारे, वनरक्षक ताडील, कु. शुभांगी गुरव वनरक्षक कोंगळा, कु. प्रियांका कदम, वनरक्षक आंबवली, श्री. अशोक ढाकणे, वनरक्षक काडवली, श्री. परमेश्वर डोईफोडे, वनक्षक तळे, श्री. राणबा प. बंबर्गेकर, वनरक्षक खवटी या पथकाने पारपाडली,
तरी अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी शिकार तस्करी होत असेल तर वन विभागाच्या टोल फ्रि क्रमांक १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाचे वतीने करणेत येत आहे.










