वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची त्वरित भरपाई द्या

राष्ट्रवादी कृषी सेल तालुकाध्यक्ष शामसुंदर राय यांची मागणी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील तुळस, आसोली पाल, मातोंड, वजराट, वेतोरे, होडावडे परिसरात गव्या रेड्यांकडून नगदी पिकांचे व फळबागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे. वनविभाग कर्मचारी पंचनामे करतात. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. वनविभागाने तातडीने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशा आशयाचे निवेदन देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वेंगुर्ला तालुका कृषी सेल अध्यक्ष श्यामसुंदर राय यांनी सावंतवाडी उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वेंगुर्ले तालुक्यातील तुळस, होडावडे दशक्रोशीतील गावात गव्यांचा कळप कार्यरत असून नगदी पिके, फळबागायती व काजू कलमांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. वन कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करतात. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी किंवा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, याबाबत वन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.

या निवेदनावर मनोहर आरोसकर, आग्नेल फर्नांडीस, गुंडू नाईक, सुनील नाईक, प्रवीण नाईक, राजन आरोसकर, प्रफुल्ल नाईक, गणपत माळकर, घनश्याम शेटकर, वासुदेव परब, विठ्ठल आरोसकर, निवृत्ती परब, दीपक शेटकर, मनोहर परब, श्रीनिवास नाईक, पंढरीनाथ नाईक, शिवराम परब, मंगेश परब यांच्या सह्या आहेत.