रत्नागिरी : करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे सीए, करसल्लागार व कर्मचाऱ्यांच्या स्पोर्टस् कार्निव्हलला (क्रीडा महोत्सव) आज शुक्रवारपासून प्रारंभ झाला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर या स्पर्धेचा प्रारंभ ज्येष्ठ क्रीडापटू भाई विलणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. क्रीडा महोत्सवात क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, रस्सीखेच, बॅडमिंटन आदी विविध स्पर्धा होणार असून रविवारी (ता. ४) सायंकाळी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी भाई विलणकर म्हणाले की, सीए होणं ही कठीण गोष्ट आहे. ही परीक्षा कठीण आहे. प्रचंड अभ्यास करायला लागतो. या अभ्यासातून शरीरयष्टी चांगली राहण्यासाठी तुम्ही खेळ जोपासला आहे, ही खरी कौतुकास्पद आहे. मला खूप अभिमान वाटला, आनंद झाला. खेळ हा आयुष्यात चैतन्य देणारा आहे. आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी खेळ, व्यायाम जोपासा. किमान एक तास यासाठी आवर्जून द्या. जसं अन्न पाणी आवश्यक तसा व्यायाम आवश्यक आहे. तुम्ही निरोगी राहाल,आयुष्यात सुखी व्हाल. मी स्पर्धेला शुभेच्छा देतो.
या वेळी करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा संस्थेचे अध्यक्ष सीए वरदराज पंडित, उपाध्यक्ष राजेश गांगण, सेक्रेटरी सीए वैभव देवधर, कोषाध्यक्ष सीए अभिजित पटवर्धन, माजी अध्यक्ष ॲड. अभिजीत बेर्डे, ॲड. उज्ज्वल बापट, सीए ऋषिकेश फडके, चंद्रशेखर साप्ते, राजेंद्र भावे यांच्यासमवेत सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, सचिव सीए शैलेश हळबे, कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी, विकासा अध्यक्ष सीए केदार करंबेळकर आदींसह सीए भूषण मुळ्ये आदींसह अनेकजण उपस्थित होते.











