चिपळूण (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक कै.श्रीकांत गोवंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. ३० जानेवारी रोजी गोवंडे सरांच्या द्वितीय स्मृती दिनाचे औचित्य साधून यशस्वी स्पर्धकांना गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात गोवंडे सरांच्या तैलचित्राचे अनावरण डि.बी.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव बापट यांच्या हस्ते करण्यात आले. वाचनालयाने उभारलेल्या कला दालनात हे तैलचित्र लावण्यात येणार आहे.
या कथालेखन स्पर्धेत पहिला क्रमांक विशाखा हेमचंद्र चितळे यांनी पटकावला तर दुसरा आणि तिसरा क्रमांक अनुक्रमे रत्नाकर विष्णू रहाटे तर अदिती अशोक तांबे यांना प्राप्त झाला. प्रा.माधवराव बापट यांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन यशस्वी स्पर्धकांना गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी कविवर्य राष्ट्रपाल सावंत यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना रत्नाकर रहाटे यांनी या प्रेरणादायी आणि चाकोरी बाहेरच्या उपक्रमासाठी वाचनालयाचे अभिनंदन केले.
वाचनालायचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी या पुढील प्रत्येक वर्षी ही कथालेखन स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याने सांगून सर्व कार्यक्रमांसाठी पडदयामागे राबणाऱ्या ग्रंथालयाच्या कार्मचारी वर्गाचे कौतुक करून धन्यवाद दिले. याच कार्यक्रमात ग्रंथालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मो.गो.कानडे उत्कृष्ट वाचक पुरस्करांचे वितरण सुध्दा करण्यात आले. सन २०२१-२२ आणि २०२२-२३ अशा दोन वर्षांसाठी उत्कृष्ट पुरूष वाचक म्हणुन निलेश कटारिया आणि सचिन उतेकर यांना तर उत्कृष्ठ महिला वाचक म्हणून निला बापट आणि सुवर्णा बहुलेकर यांना गौरवण्यात आले. आदर्श वाचकांच्या वतीने सचीन उतेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या संशोधनासाठी वाचनालयाने केलेल्या सहकार्याबदद्ल कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बापट यांनी गोंवंडे सरांच्या लेखन सातत्याबद्दल गौरवाद्गार काढले. गोवंडे सरांनी बाल साहित्यात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवले असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी व्यासपिठावर प्राचार्य माधव बापट ॲड. मकरंद साठे, राष्ट्रपाल सावंत, धनंजय चितळे, विनायक ओक, सुनिल खेडेकर, मनिष चितळे हे मान्यवर उपस्थित होते. मनिषा दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर विनायक ओक यांनी आभार मानले.











