सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर राबवली स्वच्छता मोहीम, संत निरंकारी मंडळाचा उपक्रम

Google search engine
Google search engine

 

वेंगुर्ला : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संत निरंकारी मंडळातर्फे ‘अमृत परियोजने‘ अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन‘ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून २६ फेब्रुवारी रोजी सिधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, मालवण आणि देवगड याठिकाणचे समुद्र किनारे स्वच्छ करण्यात आले.
दरम्यान, या अभियानाचा शुभारंभ यमुना नदीच्या छट घाटावर सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आला. ईश्वराने आपल्याला हे अमृतरुपी जल दिले आहे. त्याचा निर्मळ स्वरुपात सांभाळ करणे हे आपले परम कर्तव्य आहे. तसेच पाणी निर्मळ होण्याबरोबरच मनेही निर्मळ होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माता सुदीक्षाजी महाराज यांनी अभियानाच्या शुभारंभप्रसंगी केले.
देशभरातील २७ राज्ये व केंद्रशासकीय प्रदेशांतील ७३० शहरांमध्ये हे अभियान एकाच वेळी सुरु करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला येथील सागरेश्वर किनारा स्वच्छ करुन सुमारे दीड टन, मालवण बंदर जेटी ते दांडी किनारा स्वच्छ करुन सुमारे २ टन तर देवगड समुद्र किनारा स्वच्छ करुन तेथील दीड टन कचरा त्या त्या नगरपरिषदेच्या कचरा डेपोत सुपूर्द केला. प्रत्येक ठिकाणच्या स्वच्छता मोहिमेमध्ये सुमारे दीडशे ते दोनशे निरंकार भक्त मंडळ तसेच प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनीही सहभाग घेतला.
फोटोओळी – संत निरंकार मंडळातर्फे वेंगुर्ला येथील सागरेश्वर किना-याची स्वच्छता केली.