करवाढीबाबत मुख्याधिकाऱ्यांकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगिती घेणार : राजन तेली

Google search engine
Google search engine

मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागे संदर्भात सर्वानुमते निर्णय घ्यावा

सावंतवाडी शहराच्या विकासासाठी भाजपकडून भरघोस निधी

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी शहरातील नागरिकांची घरपट्टी पाणीपट्टी व इतर करांमध्ये प्रशासनाकडून करण्यात आलेली बेसुमार वाढ ही अन्यायकारक आहे. खरं म्हणजे पालिकेवर प्रशासकीय कारभार सुरू असताना आजी-माजी लोकप्रतिनिधी व नागरिकांशी चर्चा करूनच अशा प्रकारचा निर्णय घेणे गरजेचे होते. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय हा एकाधिकारशाहीपणाचा असून त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरही सकारात्मक निर्णय न झाल्यास याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या निर्णयाला स्थगिती घेण्यात येईल, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
नगरपरिषदेच्या निवडणुका लांबणीवर गेल्याने सावंतवाडी शहरात सद्यस्थितीत प्रशासकीय कारभार सुरू आहे. प्रशासक म्हणून कारभार पाहणारे प्रांताधिकारी रजेवर असताना मुख्याधिकारी यांनी सावंतवाडी शहरात घरपट्टी पाणीपट्टी व अन्य करांमध्ये बेसुमार दरवाढ जाहिर केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी या निर्णयाविरोधात आपली परखड भूमिका मांडली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा प्रवक्ते संजू परब, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शहर वगळता जिल्ह्यातील मालवण वेंगुर्ला व नगरपालिकामध्ये करप्रणालीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. मात्र, सावंतवाडी शहरातच प्रशासनाकडून असा निर्णय का घेण्यात आला त्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांकडून जाणून घेण्यात येणार आहे. तसेच याबाबत सकारात्मक चर्चा करून हा निर्णय स्थगित करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. खरे तर सर्वपक्षीय नेत्यांशी तसेच आजी माजी लोकप्रतिनिधींशी निर्णय घेऊन करप्रणाली संदर्भात निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी परस्पर घेतलेला निर्णय हा अन्यायकारक असल्यामुळे त्याबाबत त्यांच्याशी चर्चेतून निर्णय निघाल्यास भाजप तर्फे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या निर्णयावर स्थगिती घेण्याचा आमचा प्रयत्न राहील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहराच्या बाहेरून गेल्यामुळे सावंतवाडीच्या व्यापार उदिमाला काही प्रमाणात फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या माध्यमातून सावंतवाडी शहराचा विकास करण्यासाठी भाजप म्हणून आमचे प्रयत्न आहेत. यासाठी ७ कोटी ३४ लाखांचा निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून नगरपालिकेला देण्यात आला आहे. तसेच ऐतिहासिक मोती तलावात ‘फाउंटन ‘ उभा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून याबाबतचा पाठपुरावाही सुरू आहे. तसेच नरेंद्र डोंगरावरून दोन रोपवे शहरात आणण्यासाठीही आमचे प्रयत्न आहेत. पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आवश्यक निधीचा पुरवठा करीत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी अधिकचा निधी आणण्याचाही आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागे संदर्भात अनेक मतमतांतरे असून याबाबतचा निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी लोकप्रतिनिधी व नागरिकांशी चर्चा करून घेणे आवश्यक आहे. सावंतवाडी शहर तसेच शहरालगतच्या ग्रामीण भागात जागा उपलब्ध असल्यास त्यासंदर्भात पाठपुरावा करून गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रश्नाला पूर्णविराम देणे आवश्यक असून त्यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आमचे संपूर्ण सहकार्य राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.