पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे चिपळूण बचाव समितीला आश्वासन
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणच्या वाशिष्ठी नदीतील गाळ उपसासाठी २० कोटी रूपयांचा निधी टप्प्याटप्याने दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी चिपळूण बचाव समितीला दिले. त्याचबरोबर नगरपरिषद हद्दीत आरक्षण पडलेल्या मात्र जागा ताब्यात नसलेल्या जागा मालकी एनओसी घेऊन तेथे गाळ जलसंपदाकडून स्वर्खाने साठा करण्यासही परवानगी दिली असल्याची माहिती समिती पदाधिकाऱ्यानी दिली.
शहरातील वाशिष्ठी नदीत जलसंपदाकडून गाळ उपसा सुरू झाला असला तरी सद्यस्थितीत काढलेला गाळ टाकण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने उपसा थंडावला आहे. एकूणच चिपळूणच्या गाळमुक्त अभियानात उदभवणाऱ्या समस्यांसदर्भात शनिवारी बचाव समिती पदाधिकाऱ्यानी ॲड. हर्षद भडभडे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासमवेत पालकमंत्री ना. सामंत यांची मुंबई येथे भेट घेतली.
यावेळी झालेल्या चर्चेत शहरात आरक्षण पडलेल्या जागा या नगरपरिषदेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आरक्षण पडलेल्या जागांच्या मालकीची एनओसी घेऊन शासकीय खर्चाने त्या जागांत गाळ टाकावा. जेणेकडून नगरपरिषदेच्या ताब्यात आल्यानंतर या जागांवरील साठवणूक केलेल्या गाळाचा उपयोग होईल. गाळ उपसासाठी २० कोटीचा निधी टप्प्याटप्प्याने उप्लब्ध करुन दिला जाईल. यासंदर्भात लवकरच स्थानिक आमदार शेखर निकम व माजी आमदार सदानंद चव्हाण यांना घेऊन चिपळूण पूरमुक्त करिता निधी व अनेक मह्त्वाचे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी चिपळूण बचाव समितीचे राजेश वाजे, शाहनवाज शाह, किशोर रेडीज, उदय ओतारी आदी उपस्थित होते.











