रत्नागिरी | प्रतिनिधी : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी रत्नागिरी शहरातील वाहतुकीचा मोठा गोंधळ निर्माण झाला असून रत्नागिरी सारख्या छोट्या शहरात दोन ठिकाणी मुख्य मार्गच बंद करून वाहतूक अन्य ठिकाणी वळवण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असून त्यामुळे अनेक शासकीय कामे सह मोठ्या प्रमाणात वाहतूक शहरात असते. मात्र आज सोमवारी रत्नागिरीमध्ये दोन महत्वाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रत्नागिरी शहरातील आठवडा बाजारात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी रत्नागिरीत येत आहेत. यामुळे आठवडा बाजार ते घुडेवठार दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सकाळपासूनच हा मार्ग बंद करण्यात आला आहे. वास्तविक आठवडा बाजार हा रत्नागिरी शहरातील ८० फुटी मुख्य रस्त्यावरील गजबजलेला भाग आहे. मात्र रस्ता बंद करण्यात आल्याने वाहतूक अन्य ठिकाणी वळवण्यात आली. तर श्री विठ्ठल मूर्तीच्या अनावरणासाठी सुमारे तीन हजार वारकरी येणार असून त्यांची दिंडी मारुती मंदिर ते शिर्के उद्यान, माळनाका अशी होणार आहे. या दिंडीकरिता वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून आज 2 ते 5 वाजेपर्यंत मारुती मंदिर ते जेलनाका दरम्यान एकदिशा मार्ग सर्व वाहनांना बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी काल रात्री दिले आहेत. मात्र सकाळी ११ वाजल्यापासूनच माळनाका येथील एका बाजूने वाहतूक करण्यात आली आहे. त्यामुळे येथे म मोठी वाहतूक कोंडी सुरु झाली आहे.
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक दोन ठिकाणी बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची मोठी कोंडी शहरात दिसत असून वाहन चालक त्रस्त झाले आहेत. यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी, रुग्णवाहिका सह स्कुटी चालवणाऱ्या महिलांची मोठी गैरसोय यामुळे झालेली दिसून आली आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.












