खेड Breaking : कोयतीने मनगटापासून हात तोडणाऱ्यास न्यायालयाने पहा कोणती दिली शिक्षा

वरवलीमधील एकास  १८ महिने सक्त मजुरीची शिक्षेसह ३ लाखांचा दंड
 खेड | प्रतिनिधी : भात लावणी करताना पायवाटेच्या वादातुन सिताराम महादेव सावंत याचा कोयतीने मनगटावर वार करून हात तोडणाऱ्या खेड तालुक्यातील वरवली येथील परशुराम कृष्णा शिगवण यास श्री. डॉ सुधीर एम. देशपांडे, अति सत्र न्यायालय – १ खेड यांनी १८ महिने सश्रम कारावास आणि रुपये ३,लाखाचा दंड स्वरुपात पिडीत व्यक्तीस नुकसान भरपाई म्हणुन देण्याचा निकाल दिला. तसेच आरोपी कडुन देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई व्यतिरिक्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत पिडीत व्यक्ती यांस फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३५७ अ (२) प्रमाणे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणेसाठी सरकार कडे अर्ज करण्याचा आदेश ही पारित करण्यात आला.
ही घटना वरवली ता. खेड येथे ६ जुलै २००४ मध्ये घडली होती. आरोपी परशुराम कृष्णा शिगवण याने भात लावणी करताना पायवाटेच्या वादातुन सिताराम महादेव सावंत याचा कोयतीने मनगटावर वार केला. आणि त्यामुळे गंभीर दुखापत होवुन सिताराम महादेव सावंत याचा जागीच मनगटापासुनचा हात तुटला. सदर गुन्हयासंबंधी खेड पोलीस ठाणे येथे ही केस दाखल होवून खेड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी परशुराम कृष्णा शिगवण यांस १८ महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि रुपये ५ हजार  इतका दंड आणि दंड न भरलेस ३ महिने कारावास आणि दंडाची रक्कम रुपये ३ हजार व्यक्तीस देणेची शिक्षा सुनावली होती.
दरम्यान शिक्षेस आरोपी याने अति. सत्र न्यायालय खेड येथे अपील दाखल केले होते. याकामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. मृणाल जाडकर यांनी सविस्तर युक्तीवाद करणेत केला. युक्तीवादाचे पृष्टर्थ्य सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे  कोर्टात सादर करणेत आले. सरकारी वकीलांचा युक्तीवाद आणि न्यायनिवाडे यांची दखल घेवून आरोपीस १८ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा कायम करणेत आली आणि रुपये ३ लाख  नुकसान भरपाई म्हणुन पिडीत व्यक्तीस द.सा.द.शे ७ टक्के व्याजदराने दयावेत असा न्यायनिर्णय मे कोर्टाने दिलेला आहे.
सदर प्रकरणी सरकारी वकील अॅड. सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजुने, युक्तीवाद करुन संपुर्ण केसचे कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार श्री. शिनगारे, तसेच खेड पोलीस ठाणेचे कोर्ट ऑर्डरली श्री. चंद्रमुनी ठोके यांचे  सहकार्य लाभले.