दशावतार कोकणचा मानबिंदू .अनेक जुन्या आठवणी, परंपरा उराशी बाळगून दशावताराची घोडदौड आजही अभिमानाने सुरूच आहे.शरीर शाश्वत नाही परिणामी मृत्यू हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे .माणुस जन्माला येतो मातेच्या कुशीत आणि सामावतो तो मातीच्या कुशीत. माता आणि माती यामध्ये असणारी वेंलाटी म्हणजे मानवी जीवन होय.आपल्या अभिनयाच्या तेजाने दशावताराचे नभागण लख्ख करून टाकणारा राजा म्हणजे लोकराजा सुधीर कलिंगण.खेळण्या बांगड्याच्या वयात वडिल बाबी कलिंगण यांच्या सोबत सुधीरजी कलिंगण यांनी रंगमंचावर पाऊल टाकले.
वडिलांच्या अभिनयाच्या ठशांनी त्याकाळी रंगभूमी दिपुन गेली होती पण अशातही वडिलांच्या प्रतिष्ठेच्या फायदा न उचलता स्वतःच वेगळं अस्तित्व आणि वेगळी वाट निर्माण करणाऱ्या सुधीर कलिंगण यांचा सुधीर कलिंगण ते लोकराजा सुधीर कलिंगण हा प्रवास थक्क करणारा आहे.स्वताची ओळख निर्माण करायची असेल तर ऊन्हात जावे लागते. प्रसंगी रखरखीत उन्हात तापावे लागते, शरीराची लाही लाही करून घ्यावी लागते तेव्हाच चैतन्यपूर्ण अस्तित्व निर्माण होते.
वटवृक्ष खाली आपण सुरक्षित राहू शकतो मात्र स्वयंप्रकाशी कधीच नाही होऊ शकत हे सुधीरजी कलिंगण यांनी जाणले आणि गुरू म्हणून यशवंत तेडोलकर सारख्या व्यासंगी आणि उत्तम वाचक असलेल्या अनुभवी माणसाचे चरण पकडले.
नम्रता,लिनता,शालीनता असुन आणि समोरच्या माणसातील विद्वत्ता ओळखण्याची जाण असणाऱ्या लोकराजाने केवळ रंगमंच गाजवला असेच नाही तर जीवनाच्या रंगभूमी वरचे अनभिषिक्त राजे ठरले.
आपल्या अभिनयाने रसिकांना तृप्त करणारा राजा इहलोकीची यात्रा संपवुन स्वर्ग लोकी गेला पण आजही त्यांच्या भुमिका त्याची दर्जेदार वाक्य आणि दशावतारातील त्यांनी साकारलेल्या विविधांगी भुमिका आठवणीचा महापुर आणतात अन् डोळ्यांच्या कडा ओल्या होतात.
त्यांनी साकारलेल्या भुमिकाचा कस्तुरी सुगंध दशावतार रंगभूमी आजही मोहित करतो.. आठवणीना भुतकाळाचे वरदान असते पण भविष्यकाळा कडे वाटचाल करताना या आठवणी भितीचे सावट उभ्या करतात अन् वर्तमानकाळ मात्र या आठवणींनी त्रस्त करतो कारण जाणारा कलावंत जातो पण त्याने व्यापुन टाकलेल्या भुमिका साकारलेल्या व्यक्तीरेखा मात्र मग सुन्या सुन्या वाटतात आणि संवेदनशील रसिक मनाला प्रश्न पडतो, सुधीर कलिंगण लोकराजा!
पण नंतर च्या राजांचे काय?
या प्रश्नाचे उत्तर मात्र मन सुन्न करते.. दशावतार प्रबोधनाचा आत्मा असणारी आणि परिवारा समवेत बिनधास्त पणे बघावी इतकी सुसंस्कृत आणि श्रध्देने सादर होणारी लोककला पण अलिकडे मात्र या लोककलेला काही अंशी गालबोट लागल्याचे दिसते बेभान राजाचे मर्कट चाळे पाहिले की,तळपायाची आग मस्तकात जाते आणि काही कलावंतांच्या बाबतीत प्रश्न पडतो
“कुठे नेऊन ठेवलाय दशावतार आमचा!”
प्रबोधनाचा गाभा असलेला स्वातंत्र्यासाठी कामी आलेल्यां दशावतार लोककलेला आज चांगले दिवस आले पण लायकी पेक्षा जास्त भाव मिळाल्याने काही कलाकार हवेत गेले आणि दशावताराचे विकृतीकरण सुरू झाले.
अंधानुकरण वाढले पण आज या सगळ्या विरुद्ध बोलणार कोण?असा प्रश्न निर्माण झाला!
पुर्वी रसिक थेटपणे चुकीच्या गोष्टी,चुकीचे संदर्भा बाबत कलावंताशी बोलत होते आणि कलावंत हि ते ऐकून त्यात योग्य बदल करून सादरी करण करत होते त्यामुळे कलावंताना भिती असायची आपल्याला हि कोणी जाणकार,सुज्ञ रसिक आपल्या शंका, विचारतील त्यामुळे अभ्यास पुर्ण माहिती आणि भुमिका सादर केल्या जायच्या.
त्यावेळचे रसिक कलावंत चाहते होते पण तरी ही दहशत असायची ती रसिकांचीच.
जमाना बदलला आणि माणसं सुध्दा कलावंताचे फॅन्स क्लब सुरू झाले फॅन्स क्लब होऊ नये असे नाही मात्र या मुळे काही रसिकांचाच भरभक्कम पाठिंबाच या दशावताराच्या विकृतीला कारणीभूत ठरला.आपण ज्या कलावंताचे चाहते आहोत त्या कलावंताचे सादरीकरण म्हणजे प्रमाण हि भावना कलावंतांच्या विकृती आणि अंधानुकरणाला करणाला खतपाणी घालणारी ठरली.
काही रसिकांनी तर आपल्या मर्जीतील दोन ते तीन कलावंत म्हणजे दशावतार असुन बाकी कलावंत म्हणजे किस झाड की पत्ती असा अपप्रचार करत दोन ते तीन कलावंतानाच मोठं करण्याचा एक कलमी कार्यक्रम आखला आणि दिवस रात्र जाहिराती साठी सोशल मिडियाचा वापर करत नको तितकी प्रसिद्धी दिली त्यामुळे काही पात्रता नसलेले कलावंत रातोरात स्टार म्हणून वावरू लागले.
दशावतार विकृतीकरणाला काही कलाकारा इतकेच काही अतिउत्साही रसिकही जबाबदार आहेत.
दशावतार विकृती करणाचा सध्या चर्चेत असणारे विषय म्हणजे वेडा राजा..
आज काही कलावंत राजा साकारतात आणि अचानक वेडे होतात आणि प्रेक्षकांशी तर रंगमंचा समोरील छोट्या मुलांना रंगमंचावर उचलून मर्कट चाळे करतात असं हे का? असे मर्कट चाळे कोणत्या ग्रंथ पुराणातील आहेत का? आणि जर ते ग्रंथ पुराणात नसतील तर ते करतात हा सुद्धा दशावताराच्या संशोधनाचा एक विषय होऊ शकतो.
मुळात दशावतार हि लोककला महाविष्णूच्या अवतार संबंधित आहे पण काळा नुसार झालेला बदल नक्कीच स्वागतार्ह आहे.
पौराणिक कथा, ग्रंथ संपदेत,पुराणात, काही राजाच नाही तर अगदी देव सुद्धा वेडे झाल्याचे पुराण सांगते जसे सतीवृंदा हिच्या शापाने महाविष्णू, सीतेच्या शोधार्थ मर्यादा पुरुषोत्तम श्री राम तर पिंगलेच्या वियोगामुळे भर्तरी मात्र पण आज काल दशावतारात जे वेडे राजा सादर केले जातात अभिनयाने वेडे नाही तर हे वेड्यांचा भुमिका करणाऱ्या कलावंताच्या डोक्यावर खरंच परिणाम झाला की काय अशी शंका येते.
जेव्हा ते एकच कृती सातत्याने करतात जसे रंगमंचावर मुलांना परत परत उचलुन रंगमंचावर आणणे, एखाद्या मद्यपानाने धुंद झालेल्या सोबत रंगमंचावर चाळे करणे कलावंताना ना वयाचे भान असते ना आपल्या समोर स्थितीचे.
आपल्या नाट्य मंडळाचा अस्मितेचा विचार न करता त्याला विरोध न करता जास्त वेळ असा बिभित्य प्रकाराला उत्तेजन देण्याचे काम सध्य स्थितीत संगित साथिदाराकडून हि होते.
अर्थात ते म्हणतील यात आमचा दोष काय तर तुमचा दोष हा आहे की तुम्ही एखाद्या प्रसंग कितपत योग्य आहे आणि तो किती वाढवायचा ,कोणत्या प्रसंगाला किती महत्त्व द्यायचे हे ठरविण्याचा अधिकार तुमचा आहे.
कारण शेवटी साथ आपण देता
त्यामुळे यांचा विचार साथीदार म्हणून वादकांनी करायला हवा नाट्यात वादकांची साथ कलावंत इतकीच महत्त्वाची असते
त्यामुळे कोणत्या प्रसंगाला किती महत्त्व द्यायचे हे सद् विवेक बुद्धीने वादकांनी ठरवावे.
वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊन अधिक अभिनय शुन्य वेड्याना आपण विचार न करता साथ करता तेव्हा तुम्ही हि वेडे ठरता.आणि मग अशाना रंगमंचापेक्षा वेड्याच्या इस्पितळात ठेवण्याची गरज असल्याचे वाटते.
त्यामुळे रंगमंचावर आपण काय करतो याचे भान प्रत्येक कलाकाराला हवंच.
भरत मुनींनी नाट्य शास्त्रात रंगमंचावरील मर्यादा दिलेल्या आहेत , आणि बंधन पाळणे आवश्यक आहे.
वेडाचंदन लोकराजा सुधीर कलिंगण यांनी वेडा साकारला आणि तो वेडा ब्रॅण्ड बनला हि वेड्याची भुमिका आजही अजरामर आहे.
दशावतार हा कोण्या एका परिवाराची मक्तेदारी नाही तुम्ही कलावंतांनी हवे तसे तोंड मोड करायला.
तेव्हा जनाची नाही तर मनाची लाज बाळगा आणि जे काय करताय ते चौकटीत राहून करा.
कोणी तरी बोलले पाहिजे इतकी भिषणाव स्थिती निर्माण आज झाली असल्याचे दिसते समाजात वावरताना वेड लोक यांचे वावरणे कसं असतं याचे निरीक्षण जर लोकराजा सुधीर कलिंगण इतकंच जर या वेड्या राजा ची भुमिका साकारणाऱ्या सध्य स्थितीतील कलावंतानी केले असते तर रंगमंचावर वेडा साकारताना दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या रसिकांना आणि सतत रंगमंचा वरील सीमांचे बंधन तोडून एकेक करून लहान मुलाना रंगमंचा वर आणुन मर्कट चाळे करणाऱ्या स्वयंघोषित राजाना अभिनयाने वेडा साकारता आला असता मग मात्र धांगडधिंगा घालायची वेळ आलीच नसती.
अजुन एक गोष्ट प्रखरतेने दिसते ते भिक मागणारा राजा..
आज बरेच राजा भीक मागतात.. दशावतार आज शासन दरबारी कदाचित उपेक्षित असलं पण भिक मागुन जगाण्या इतकी तरी भिषणाव स्थिती सध्या तरी नाही जेव्हा आपण राजा साकारता तेव्हा आपण एक राजा असता तेव्हा रंगमंचावरून भिक मागत रसिकांत फिरणं कितपत योग्य?
मग आजचे अंती शहाणे कलावंत पुर्वी कलावंत असंच करायचे असा युक्तिवाद हि करतील पण त्याचे हि उत्तर आज आपल्याला जाणुन घेणे गरजेचे आहे.
पुर्वी गरीबी पाचवीला पुजलेली होती काही कलाकार तर केवळ दोन वेळ जेवायला मिळावे म्हणून दशावतारात आले आणि अभिनयाने लौकिकाच्या शिखरावर पोचले
हाल, अपेष्टा,अवहेलना झाली, काहीनी तर घरादारावर तुळशी पत्र ठेवली आणि दशावतार समृद्ध केले आज हे कलावंत आज आपल्याला नाहीत पण त्याचा त्याग मातीमोल करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि आपण घराणे शाहीची मक्तेदारी प्रस्थापित करू इच्छित असाल तर तुमच्या इतकं मुर्ख तुम्हीच कारण दशावतार हि लोककला आहे.
त्यावेळी कलावंताना दोन वेळेचे जेवण मिळताना नाके
नऊ व्हायचे मात्र या काळात मालक हि सर्व कलावंत माझ्या परिवारातील सदस्य असल्या सारखे माया करायचे .प्रवास पायी चालत असायचा कलावंतानी एकदा घर सोडले की वीस वीस दिवस घरचं नसायचं जेवणं, झोपणं, खाणं पिणं आधी गोष्टी या दशावताराच्या बिऱ्हाडात व्हायच्या अशा वेळी श्रम परिहारासाठी कधीतरी चमचमीत कोंबडी जेवणाची सोय व्हावी म्हणून विशेषत: शिव पुराणातील भाग सादर व्हायचं ज्या नाट्य प्रयोगात राजाची सत्व परीक्षा घेणारा शिव शंकर दानाला दक्षिणा दे म्हणून राजाला भिक्षा पात्रातुन भिक्षा मागायला लावायचा भिक्षा मागताना साथ संगत करणारे मर्जी माप संगीत देऊन प्रसंग सादर करताना ते सादरीकरण दर्जेदार होण्याकडे लक्ष असायचे नाही भिक्षा पात्र कडे आणि विशेष म्हणजे रसिक रंगमंचावर येऊन हि भिक्षा घालायचे काही वेळातच हे पात्र भरायचे यांचे कारण त्या राजाने भिक्षा मागण्या अगोदर केलेला सर्वांग सुंदर अभिनय..
मात्र आज हे भिक्षा मागणारे राजा रंगमंचावर भिक्षा न मागता थेट रसिकांवर्गात जाऊन भिक्षा मागताना दिसतात याचं एकमेव कारण त्यांना माहित असतं रसिक माझ्या पर्यंत देण्याइतका सक्षम अभिनय मी करू शकतं नाही.आणि परिणाम भरत मुनींच्या नाट्य शास्त्रातील नियम बाजुला करुन रंगमंचावरील मर्यादा तोडल्या जातात.
अलिकडे राजा हरिश्चंद्र नाटकात ही राजा हरिश्चंद्राला भिकेला लावण्या इतपत आज राजा साकारणाऱ्या कलावंतानी मारलेली मजल कलावंताचे अज्ञान दाखवते
राजा हरिश्चंद्र भिक्षा मागत नाही तर तो शरिरविक्रय करतो.आता शरीर विक्रय म्हणजे काय हे न कळत्या इतपत आपण लहान नक्कीच नाही
दशावतारात केलं जाणारं अंधानुकरण आज टाळणं गरजेचं आहे आणि मालक , संचालक यांनी हि या गोष्टी जाणून घेऊन आपल्या कलावंतांच्या सादरीकरण भर दिला योग्य समन्वय साधला तर या चुकीच्या पद्धतीने सादर केला जाणारे गोष्टीवर नियंत्रण येईल.
त्यावेळी परिस्थिती प्रतिकूल होती पैसा खुपचं कमी मिळायचा मग अशा वेळी सर्व कलाकारांना चांगले चमचमीत कोंबडी खायला मिळावी म्हणून कधी तरी असे राजा भिक्षा मागतोय असे नाट्य प्रयोग केले जायचे रसिकांच्या कडून त्या राजाच्या भिक्षा पात्रात मिळालेली भिक स्वरूपात मिळालेले पैसे कलावंताची कोंबडी जेवणाची सोय करायचे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हि त्याकाळी दशावतार कलावंतानी मालकांनी सर्व कलाकारांचा विचार केला स्वतः ला मिळालेली भिक ना घरी घेऊन गेले ना स्वतः साठी वापरली हा दशावताराचा परोपकारी इतिहास जाणून घ्या.
आज काळ बदलला पुर्वी सुध्दा काही दिग्गज कलावंताकडून चुका घडल्यात ते नाकारता येणार नाही पण त्या चुका त्या गावात पुरत्या,त्या पंचक्रोशी पुरत्या मर्यादित राहायच्या कारण सोशल मिडिया नव्हती आज मात्र कलावंतानी हे माहिती करून घ्यावेच लागेल आता आपण जे सादरीकरण करता ते रसिक मोबाईलला शुटिंग करतात आणि सोशल मिडियावर टाकतात आणि रसिकां आपण टाकु नका असे बोलण्यापेक्षा कलावंत म्हणून आपणच जर मर्जेमाप आणि जबाबदारीने भुमिका केलात तर हे प्रकार नक्कीच या गोष्टी थांबु शकतात थोडक्यात काय “उन्हात पाय पोळतात म्हणून संपूर्ण जमिनीत कातडं पांघरण्या पेक्षा तुम्ही तुमच्या पायात चप्पल घाला” हे सांगण्या इतपत आपण अज्ञानी नक्कीच नाही.
दशावताराच्या वर्तमान आणि भविष्यकाळाची जबाबदारी आता दशावताराचा राजा म्हणून तुमच्यावर आहे आणि आज आव्हाने सुध्दा तितकीच आहेत हे भान ठेवून जर मर्जेमाप भुमिका झाल्या तर निश्चितच ती लोकराजाला आदरांजली ठरेल अन्यथा लोकराजा सुधीर कलिंगण नंतरच्या पुढच्या राजाचे काय?
हा प्रश्न अनुत्तरित राहिले….