शिरगाव येथून माघवारी पायी दिंडीचे श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान
शिरगाव (वार्ताहर) टाळ मृदुंगाच्या गजरात व विठ्ठलनामाच्या अखंड जयघोषात देवगड तालुक्यातील शिरगाव वारकरी संप्रदायाची माघवारी पायी दिंडीने बुधवारी सकाळी शिरगाव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी शिरगाव गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीच्या देवालयात श्रीफळ ठेवून माघवारी पायी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. सकाळी बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरात शिरगाव दशक्रोशीतील वारकरी, ग्रामस्थ, विविध क्षेत्रांतील मान्यवर एकत्र येऊन हरीपाठ व आरतीचा कार्यक्रम पार पडला. हनुमान मंदिरास प्रदक्षिणा
पुर्ण झाल्यानंतर माघवारी पायी दिंडीचे शिरगाव येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी सुहासिनीनी वारकरी माऊलींचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या.
यानंतर दिंडी शिरगाव बसस्थानकासमोर आल्यानंतर दिंडी चालली.. चालली..चालली.. पंढरपुरा….,हरी मुखे म्हणा.. हरी मुखे म्हणा , सुंदर ते उभे विठेवरी…, या सारखे वारकरी अभंग गात विठूनामाच्या जयघोषात रिंगण केले. दिंडीत सहभागी झालेल्या वारकरी माऊलींना शुभेच्छा देण्यासाठी क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. विठ्ठलनामाच्या गजरात पहाटेपासूनच शिरगावनगरी दुमदुमून निघाली होती. या दिंडीने शिरगाव ओम गणेशमंदिर, आंबेखोल येथील शिवाजी चौक, श्री स्वामी समर्थमठ, विठ्ठल मंदिर येथे आरती करून दुपारी नांदगाव येथील प्रमोद लोके यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.त्यानंतर दिंडीने कणकवली तालुक्यातील लोरे नं. १ कडे प्रस्थान केले.
या दिंडीतून वारकरी संप्रदायाचा प्रसार व्हावा.तसेच यामुळे सामाजिक सलोखा निर्माण होऊन ऐकमेकांबद्दल आदरभाव वाढीस लागेल. असे मत माघवारी पायी दिंडीप्रमुख ह भ प सर्वोत्तम साटम महाराज यांनी यावेळी सांगितले.












