राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांची मागणी, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
लांजा (प्रतिनिधी) शासनाने नवीन शिक्षक भरती करण्यापूर्वी जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस अजित यशवंतराव यांनी केली असून याबाबतचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना सादर केले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केलेल्या या निवेदनात म्हटले आहे की सन २०१८ साली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो शिक्षक दुर्गम भागात बदलीने गेले. त्यामधील अनेक जण अद्यापही दुर्गम भागात आहेत. सन २०२२ साली झालेल्या ऑनलाईन बदलांमध्ये दुर्गम भागातील शिक्षकांना रिक्त जागा दाखवल्या नाहीत. त्यामुळे त्यांना बदली मागता आली नाही. त्याप्रमाणे सन २०२३ या वर्षी बदल्या करताना सन २०१८ साली जी सुगम दुर्गमची यादी वापरण्यात आली होती, तीच यादी आता वापरणे गरजेचे आहे. याचे कारण २०२२ मध्ये सुगम दुर्गमची जी यादी बनवण्यात आली आहे त्यामध्ये 90% भाग सुगम दाखवण्यात आला आहे. सन २०२३ च्या बदल्यात संवर्ग तीन मधील बदली अधिकारप्राप्त अनेक शिक्षकांना बदलीची संधी मिळालेली नाही .
समुपदेशन प्रक्रिया राबवून या महिन्यात जिल्हा अंतर्गत बदली कार्यवाही करण्यात यावी. संभाव्य भरती प्रक्रियेस अनुसरून ज्याप्रमाणे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया करण्यात आली तशीच जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी .आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या जागा तसेच एप्रिल पर्यंत सर्व रिक्त जागा जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेसाठी दाखवण्यात याव्या .आणि जिल्ह्यातील बदली इच्छुक शिक्षकांना बदलीची संधी देण्यात यावी. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बदली प्रक्रिया तातडीने सुरू करण्याबाबत आपण आपल्या स्तरावर तातडीने आदेश द्यावे अशशा मागण्या या अजित यशवंतराव यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.
याबाबत लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले असल्याचे अजित यशवंतराव यांनी सांगितले.










