गुहागर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला दिमाखदार व उत्साह पूर्ण वातावरणामध्ये सुरुवात…. 

 

गुहागर l प्रतिनिधी :जिल्हा परिषद शिक्षण विभाग रत्नागिरी व शिक्षण विभाग पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाना जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जानवळे नंबर 1 क्रीडा नगरीमध्ये उत्साह पूर्ण वातावरणामध्ये सुरुवात झाली. कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर साहेब यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून झाली. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जानवलेग्रामपंचायतीच्या सरपंच जानवी विखारे, भातगावच्या सरपंच रेणुका आग्रे, पाचेरी सडाचे सरपंच संतोष आंब्रे, तहसील कार्यालयाचे मंडल अधिकारी राठोड साहेब, गटशिक्षणाधिकारी भागवत मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप कोंडविलकर, पोलीस पाटील संतोष जानवळकर, विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव अंतिम संसारे, गुहागर तालुका बौद्धजन सहकारी संघाचे अध्यक्ष सुनील जाधव, माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गोरीवले सर ,रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष कदम सर, प्राथमिक शिक्षक सर्व संघटनांचे अध्यक्ष व सचिव ,शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गावणकर व गळवे साहेब ,सर्व केंद्रप्रमुख ,शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर, संचालक चंद्रकांत झगडे, गुहागर तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक, नागरिक व केंद्र व बीट स्तरावर विजयी झालेले सर्व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री केळसकर साहेब हे होते. त्यावेळी आकर्षक अशी मेघ डंबरी जानवळे येथील सुविद्य ग्रामस्थ श्री दिनेश शितप यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आली होती .त्यामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सरपंच विखारे मॅडम यांनी पुष्पहार अर्पण केला. केळसकर साहेब यांच्या शुभहस्ते क्रीडा ध्वजाचे अनावरण करण्यात आले .क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन सरपंच विखारे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तर क्रीडा ज्योतीचे स्वागत कोंडविलकर साहेब यांनी केले. विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रतिज्ञा सादर केली. उपस्थित सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटेल असा नयनरम्य असा दिमाखदार सोहळा होता .जानवले नंबर एक क्रीडा नगरीमध्ये संपन्न झालेल्या या स्वागत समारंभ कार्यक्रमाच्या प्रसंगी अंजनवेल नंबर दोन शाळेच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे झांज पथक संचलन केले .तसेच क्रीडा रसिकांचे मनोबल व उत्साह वाढवण्यासाठी जानवले नंबर एक शाळेच्या गुणवान विद्यार्थ्यांकडून झुंबा नृत्य सादर करण्यात आले .क्रीडा नगरी समोर आकर्षक अशा रांगोळीचे रेखाटन कलाशिक्षक श्री राजू सुर्वे, सुहास चव्हाण, नीलकंठ पावसकर, ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले होते. तालुका स्पर्धेच्या वेळी होणाऱ्या खो-खो ,कबड्डी, लंगडी ,लांबऊडी , उंचउडी ,गोळा फेक, थाळीफेक, धावणे , व क्रिकेट या क्रीडा प्रकाराचे मैदान जानवले येथील ग्रामस्थ व चिखली बीट येथील सर्व शिक्षक यांनी मेहनतीने केले होते .सर्व शिक्षक संघटना यांच्या सहकार्याने, सर्व विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या सहयोगाने गटशिक्षणाधिकारी भागवत मॅडम यांच्या अध्यक्षतेखालील संयोजन समितीने देखणे असे नियोजन केले होते .क्रीडा स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या होत्या .सर्व मान्यवर व यजमान शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास शार्दुल यांचा त्यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी भागवत मॅडम यांनी केले. त्यावेळी बोलताना सहाय्यक गटविकास अधिकारी केळसकर साहेब म्हणाले की केंद्र व बीट स्तरावर विजयी होऊन आलेले सर्व विद्यार्थी या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करतील आणि यापुढे जिल्ह्यामध्ये जाऊन आपल्या तालुक्याचे नाव लौकिक वाढवतील .

क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी तसेच गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम सर्व शिक्षक एकजुटीने परस्परस सहकार्याने यशस्वी करतात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. तालुकाभरातून आलेले विविध सरपंच आणि ग्रामस्थ यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले .कार्यक्रमाला त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या व पंचायत समिती गुहागर या क्रीडा स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी आपल्याला सर्वतोपरी सहकार्य देईल असे अभिवचन त्यांनी दिले. तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा हा एक मोठा दिमाखदार क्रीडा महोत्सवच आहे, यातूनच राज्यस्तरा पर्यंतचे खेळाडू घडतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. मान्यवरांच्या शुभहस्ते पंचप्रमुखांना क्रीडा फाईलचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री कैलास शार्दुल तर आभार प्रदर्शन श्री गावणकर साहेब यांनी केले.